The administration was forced to close the queues for darshan at the Tulja Bhavani temple.
तुळजापूर : पुढारी वृत्तसेवा
तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची शनिवारी तुळजापुरात प्रचंड गर्दी झाली. गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने प्रशासनाला शनिवारी रात्री नऊ वाजताच दर्शनाच्या रांगा कुलूपबंद करण्याची नामुष्की ओढवली. दर्शन मंडप फुल्ल झाल्याने हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आला, मात्र यामुळे हजारो भाविकांना मध्यरात्री 1 वाजेपर्यंत ताटकळत राहावे लागल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
सलग सुट्ट्या आणि आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुकांकडून मतदारांना दर्शनासाठी आणले जात आहे. त्यामुळे शनिवारी रात्री शहरात एकाच वेळी अनेक खासगी ट्रॅव्हल्स दाखल झाल्या. परिणामी, दर्शन मंडपाचे चारही मजले खचाखच भरले. रात्री 11 वाजता मंदिर बंद करण्याच्या वेळेचे गणित आणि आतमध्ये झालेली गर्दी पाहता, मंदिर संस्थानला रात्री 9 वाजताच रांगा बंद कराव्या लागल्या. यावेळी तहसीलदार माया माने यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी धावपळ केली. या काळात अनेक दरवाजे बंद असल्याने भाविकांना प्रवेश मिळवण्यासाठी कसरत करावी लागली.
गाभारा विस्तारीकरण गरजेचे
मंदिर विकास आराखडा राबवत असताना देवीचे गर्भ गृह (गाभारा) आणि मंदिर परिसर विस्तार करण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. 10 पदरी दर्शनाच्या रांगा आणि परिसर मोठा केल्याशिवाय मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा आणि सुट्ट्यांच्या दिवशी गर्दीचे नियोजन करणे अशक्य आहे. शिर्डीच्या धर्तीवर आराखडा तयार करून अंमलबजावणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
मंदिर विकास आणि तुळजापूर शहराचा विकास या मुद्द्यावर स्थानिक खासदार आणि आमदारांनी आपसातील राजकीय वैर बाजूला ठेवावे. विकासाच्या कामात राजकारण न आणता केवळ भाविकांचे हित लक्षात घेऊन पाठिंबा द्यावा, अशी तीव्र लोकभावना व्यक्त होत आहे.
सशुल्क दर्शनाचा फटका
गर्दीच्या काळात 500 आणि 200 रुपयांच्या सशुल्क पासधारकांनाही दर्शन मिळण्यासाठी अनुक्रमे दीड ते अडीच तास लागले. सशुल्क दर्शनाच्या रांगेमुळे धर्मदर्शन (मोफत) रांगेतील भाविकांना अडथळा निर्माण होतो. त्यांना देवीच्या मूर्तीऐवजी केवळ पुढच्या भाविकांच्या पाठमोऱ्या आकृती पाहाव्या लागतात, यामुळे सामान्य भाविकांत नाराजी आहे. तसेच मंदिरात तैनात असलेल्या खासगी सुरक्षा रक्षकांच्या कार्यपद्धतीवरही संशय व्यक्त केला जात आहे.
प्रशासनाने गांभीर्य बाळगावे कोणत्याही परिस्थितीत प्रशासनाने आणि शासनाने भाविकांना सुलभ दर्शन देण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासाठी शहरातील सर्वांनी एकत्र येऊन वादविवाद टाळावेत. अधिकारी आणि प्रशासनाने कोणाचे ऐकावे आणि कोणाचे ऐकू नये, याविषयी गांभीर्य बाळगावे.महंत वाकोजी बुवा, तुळजाभवानी मंदिर.