Thackeray Shiv Sena : ठाकरेंच्या शिवसेनेला अतिआत्मविश्वास नडला File Photo
धाराशिव

Thackeray Shiv Sena : ठाकरेंच्या शिवसेनेला अतिआत्मविश्वास नडला

मतविभागणी झाली नसती तर निकाल असता वेगळा

पुढारी वृत्तसेवा

Thackeray's Shiv Sena suffered defeat due to overconfidence.

भीमाशंकर वाघमारे

धाराशिव : पालिका निवडणुकीत आलेल्या सपशेल अपयशाला शिवसेनेचा ठाकरेंच्या अतिआत्मविश्वास नडल्याचे अध ोरेखित झाले आहे. पालिकेसाठी तिन्ही पक्षांची एकजूट कायम ठेवली असती तर कदाचित आजचा निकाल वेगळा दिसला असता, असे मत राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत. दरम्यान, याचा महाविकास आघाडी एकत्र नसल्याचा पुरेपूर लाभमात्र 'भाजप'ने खुबीने मिळविला.

२०१६ मध्ये पालिका निवडणुकीत शिवसेनेचे मकरंद राजेनिंबाळकर जनतेतून नगराध्यक्षपदी विजयी झाले होते. तर विरोधी पक्ष राष्ट्रवादीचे १७ नगरसेवक विजयी झाले होते. त्यांना एका अपक्षाचाही पाठिंबा होता. तर शिवसेनेचे ११, भाजपचे ८ नगरसेवक विजयी झाले होते. काँग्रेसचे अवघे दोन नगरसेवक सभागृहात होते. तेव्हा ३९ सदस्यसंख्या होती. अर्थात तेव्हा शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध होते. मागील पाच वर्षात राजकीय उलथापालथ झाली. त्यात अनेक ताकदवर नेत्यांचे पक्षांतर झाले. तशीच रचना खालीही आली.

दीड वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा व वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात महाविकास आघाडीला नेत्रदीपक यश मिळाले. त्यामुळे तोच कित्ता आताही गिरवला जाईल, अशी आशा मविआच्या समर्थकांनी होती. प्रत्यक्षात जागावाटपावरुन तणातणी झाली. तुटेपर्यंत ताणले जाणार नाही, अशी आशा कार्यकत्यांना होती. प्रत्यक्षात मात्र अवघ्या दोन जागांवरुन मतभेदाची दरी वाढली. अन् पवारांच्या राष्ट्रवादीने मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

४१ सदस्यांच्या या संख्याबळाचा विचार करता युबीटी शिवसेनेने स्वतःकडे २१ जागा ठेवून उर्वरीत २० जागांचे वाटप काँग्रेस, राष्ट्रवादीला केले असते तर आज चित्र वेगळे दिसले असते, असे मत राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत. वाटाघाटी यशस्वी करण्यात मोठा भाऊ असलेली शिवसेना कमी पडली, असे सध्या तरी चित्र दिसत आहे. तुतारीसारखे चिन्ह अध्यक्षपदाच्या उमेदवाराला मिळाल्याने केवळ मुसलिमच नव्हे तर प्रत्येक प्रभागातून मतांची कमाई परवीन कुरेशी यांना झाली.

त्यामुळे अनपेक्षितरित्या मशाल चिन्ह तिसल्या क्रमांकावर गेले. वास्तविक मशाल आणि तुतारीला मिळालेल्या मतांची बेरीज केली तर ती कमळाच्या चिन्हाला मिळालेल्या मतांपेक्षा १० हजारांनी अधिक आहे. या गोंधळातच क्रॉस व्होटींगचे प्रकार प्रत्येक प्रभागात झाले. त्याचाही मोठा फटका ठाकरेंच्या शिवसेनेलाच बसला.

जिल्हा परिषदेसाठी हवीत सावध पावले

'मविआ'च्या माध्यमातून निवडणूक लढली तरच भाजपच्या ताकदीशी तुल्यबळ लढत होऊ शकते, असा विश्वास लोकसभा, विधानसभा निवडणुकांनी दिलेला आहे. त्यामुळे त्याचा विचार करून व पालिका निवडणुकीतील चुका टाळून काही दिवसांवर आलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांची रणनीती शिवसेनेला ठरवावी लागणार आहे, अशी चर्चा आता कार्यकर्त्यांत होऊ लागली आहे.

भाजपला मोठा लाभ

दरम्यान, या निवडणुकीत 'मविआ'तील नाराजी नाट्याचा थेट लाभ भाजपने घेतला. मविआच्या प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवून असलेल्या भाजपने त्या त्या वेळी योग्य पावले उचलत निर्णय घेतले. त्याचा घसघशीत लाभ पालिकेत मिळाला. नेहा काकडे यांच्यासारखा नवखा उमेदवार रिंगणात उतरवून आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी विरोधी पक्षांना धोबीपछाड दिला.

शिवसेनेच्या हाती भोपळा

दरम्यान, या निकालाने शिवसेनेला जबर झटका दिला आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना या परीक्षेत नापास ठरली आहे. एकही नगरसेवक विजयी झाला नसल्याने पक्षाला मरगळ येणार हे स्पष्ट आहे. पालकमंत्री शिवसेनेचा असूनही जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या शहरात पक्षाची सुमार कामगिरी झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT