बाळासाहेब जाधवर
रत्नापूर :वाशी तालुक्यातील तेरखेडा हे गाव मराठवाड्याची “शिवकाशी” म्हणून ओळखले जाते. येथे मोठ्या प्रमाणावर फटाके तयार केले जातात. मात्र, या उद्योगामागील भयानक वास्तव म्हणजे येथील कारखान्यांतील कामगारांची सुरक्षितता ही पूर्णपणे दुर्लक्षित असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
दि. 31 जानेवारी रोजी खामकरवाडी शिवारातील गुडलक फायर वर्क्स या कारखान्यात अचानक स्फोट झाला. या स्फोटात कारखानदाराचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यादिवशी तेरखेडा येथे आठवडी बाजार असल्याने कारखान्यास सुट्टी होती, हीच बाब अनेक मजुरांचे प्राण वाचवणारी ठरली.मात्र, ही पहिलीच घटना नाही.
गेल्या वर्षी 1 फेब्रुवारी 2025 रोजी बाबा फायर वर्क्स कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात आठ मजूर गंभीररित्या भाजले गेले होते. त्यापैकी एका मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेनंतर काही दिवस प्रशासन खडबडून जागे झाले, चौकशीचे नाट्य झाले; परंतु कालांतराने सर्व काही जैसे थे झाले.तेरखेडा परिसरात सध्या सुमारे 30 फटाका कारखाने कार्यरत असून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. या उद्योगामुळे स्थानिक मजुरांना रोजगार मिळत असला तरी त्यांच्या जीवाची किंमत मात्र नगण्य ठरत असल्याचे चित्र आहे.
आवश्यक सुरक्षा साधने, प्रशिक्षण, अग्निशमन यंत्रणा आणि नियमांची अंमलबजावणी याकडे कारखानदार व प्रशासन दोघेही डोळेझाक करत असल्याचा आरोप सुज्ञ नागरिकांकडून केला जात आहे.“स्फोट झाल्यानंतरच प्रशासन जागे होते, थातूरमातूर कारवाई केली जाते आणि पुन्हा सर्व काही पूर्ववत सुरू होते,” अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी किमान महिन्यातून एक ते दोन वेळा तरी कारखान्यांची तपासणी करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.कामगारांचे प्राण की कारखानदारांचा नफा, असा सवाल आता ऐरणीवर आला आहे. पुढील दुर्घटना होण्याआधी प्रशासन ठोस पावले उचलणार का, की पुन्हा एकदा निष्पाप मजुरांना आपला जीव गमवावा लागणार, याकडे संपूर्ण मजुराचे लागले आहे.