Tanaji Sawant inquiry threat Viral Video: निवडणुकीच्या रणधुमाळीत धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. धाराशिव जिल्ह्यातील पारा जिल्हा परिषद गटामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर सभेत बोलताना आमदार तानाजी सावंत यांचा अत्यंत आक्रमक अवतार पाहायला मिळाला. आपलाच एक जुना कार्यकर्ता बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्याने सावंत यांनी मंचावरूनच त्याला जाहीर इशारा दिला आहे.
तानाजी सावंत यांनी बंडखोर उमेदवारावर थेट टीका करताना म्हटले की, "इन्क्वायरीच (चौकशी) लावतो तू बघ, थांब आता मी काय करतो! सर्वसामान्यांचे रक्त कोणी पिणार असेल किंवा त्यांना वेठीस धरणार असेल, तर ते मी अजिबात सहन करणार नाही. तुमच्याकडे जेवढे आहे, त्याच्या दहापट माझ्याकडे आहे. तुम्हाला जर तुमच्या मनगटाचा लय माज (न्याट) असेल ना, तर त्याच्या शंभर पट ताकद माझ्याकडे आहे."
सावंत यांनी आपली ताकद अधोरेखित करताना पुढे म्हटले, "माझा नाद करायचा नाही, 'मी मी' म्हणणाऱ्यांचे पाणी मी जिरवले आहे, हे ध्यानात ठेवा. मी संपूर्ण महाराष्ट्र फिरवलेला तानाजी सावंत आहे. हा तर केवळ एक जिल्हा परिषद गट आहे. प्रत्येकाने आपल्या अवकातीत राहावे आणि जेवढे शोभते तेवढेच काम करावे, या मताचा मी आहे."
तानाजी सावंत यांचे खंदे समर्थक मानले जाणारे कार्यकर्ते आता त्यांच्याच विरोधात अपक्ष म्हणून मैदानात उतरल्याने सावंत यांचा संताप अनावर झाला होता. आपल्याच कार्यकर्त्यांनी विरोधात भूमिका घेतल्याने त्याचा फटका निवडणुकीत बसू शकतो, या भीतीने सावंत यांनी अत्यंत कठोर भाषेत हा दम भरल्याचे बोलले जात आहे. या इशाऱ्यामुळे आता पारा जिल्हा परिषद गटातील निवडणूक केवळ लढत न राहता प्रतिष्ठेची लढाई बनली आहे.