

पंढरपूर : कार्तिकी एकादशीला श्री विठ्ठल-रूक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कुटुंबियांसह केली. या दौऱ्यावर येताना मंगळवेढ्यापासूनच त्यांनी विविध पक्षांमधील अनेक मातब्बर नेतेेमंडळींना भेटीसाठी आवर्जून वेळ दिला. पंढरपूर येथील आ. तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी शिंदे यांनी भेट देत सावंत यांच्या उपस्थित पंढरपूर येथील राजकीय खलबते केली आहेत. त्यामुळे आ. सावंत यांच्या घरी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल्या भेटीला विशेष महत्त्व आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शहरासह ग्रामीण भागात राजकीय वारे जोरात वाहू लागलेले आहे. असे असतानाच कार्तिकी यात्रा सोहळ्याच्या निमित्ताने शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पंढरपूर दौरा सर्वपक्षीय नेत्यांच्या गाठीभेटींमुळे चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.
याबरोबरच अनेक दिवसांपासून सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणापासून अलिप्त असलेले माजी आरोग्यमंत्री आ. डॉ. तानाजी सावंत हेही पुन्हा नव्या जोमाने सक्रीय झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पंढरपुरात माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांच्यासह अनेकांनी त्यांची भेट घेतली. कार्तिकी यात्रेदरम्यान, आ.डॉ.सावंत यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागताचे फलक शहरभर लावलेले दिसून आले. तसेच येथे ना. शिंदे यांनी प्रत्येक कार्यक्रमात आ.डॉ. सावंत यांना सोबत घेतलेले होते. त्यामुळे आ.डॉ. सावंत हे पुन्हा पंढरपूरसह जिल्ह्याच्या राजकारणात पूर्वीप्रमाणे सक्रीय होणार असल्याचे संकेेत समर्थकांकडून दिले जात आहेत.
सावंत यांच्या निवासस्थानी आ.डॉ. तानाजी सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते अनिल सावंत व कुटुंबियांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे आ. अभिजित पाटील, भाजपचे आ. गोपीचंद पडळकर, शाम गोगाव, प्रा. सुभाष मस्के, माऊली हळणवर, शिवसेनेचे चरणराज चवरे, साईनाथ अभंगराव, सुधीर अभंगराव, संभाजी ब्रिगेडचे किरण घाडगे, राष्ट्रवादीचे संदीप मांडवे, प्रथमेश पाटील, चंद्रशेखर कोंडूभैरी आदी उपस्थित होते.