धाराशिव : भीमाशंकर वाघमारे
धाराशिव जिल्ह्याचे नाव डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या रूपाने मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत अनेकदा आले. मात्र नशिबाची साथ न मिळाल्याने ती संधी हुकली. आता मात्र उपमुख्यमंत्रिपदावर या जिल्ह्याची लेक विराजमान झाल्याने मुख्यमंत्रिपद हुकल्याची हुरहुर काहीशी भरून निघाली आहे. डॉ. पाटील यांच्या भगिनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्या सुनेत्रा अजित पवार यांची या पदावर निवड झाल्याने विकासकामांच्या बाबतीत माहेरला झुकते माप मिळेल, अशी आशा सामान्य जनतेतून व्यक्त होत आहे. तेर हे सुनेत्राताईंचे माहेर असून डॉ. पद्मसिंह पाटील हे त्यांचे बंधू आहेत.
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या रिक्त जागी पत्नी सुनेत्रा यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार मुख्यमंत्री असताना डॉ. पाटील हेही सातत्याने मंत्रिमंडळात असायचे. या दोन्ही नेत्यांच्या घट्ट मैत्रीतूनच अजित पवार आणि सुनेत्रा यांचा विवाह झाला. प्रत्येक महत्त्वाचा घरगुती कार्यक्रम असला की, सुनेत्राताईंची तेर येथे भेट ठरलेली असते. यातूनच त्यांची माहेरची ओढ स्पष्ट होते. ज्येष्ठ बंधू डॉ. पाटील वयोमानामुळे सध्या राजकारणात सक्रिय नसले तरी कुटुंबाची मोट बांधून ठेवणारा मुख्य धागा म्हणून ते आजही आपली जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांचे पुत्र म्हणजेच सुनेत्राताईंचे भाचे राणा जगजितसिंह पाटील हे सध्या भाजपचे आमदार आहेत.
माहेरकडूनही राजकीय वारसा
सुनेत्रा यांना राजकीय वारसा माहेरकडून जसा लाभलेला आहे, तसाच तो सासरकडूनही वैभवशाली आहे. त्यामुळे राजकारण हा विषय त्यांच्यासाठी नवा नाही. दोन-अडीच वर्षांपूर्वी घडलेल्या राजकीय नाट्यानंतर अजितदादांनी वेगळी भूमिका घेतली. त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्यांना यश मिळाले नाही. त्यानंतर काही दिवसांतच अजित पवारांनी त्यांना राज्यसभेची संधी देत विजयी केले. 28 जानेवारी रोजी अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर रक्षा विसर्जनाच्याच दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या आणि उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्राताईंचे नाव चर्चेत आले. शनिवारी अखेर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
उपमुख्यमंत्रिपदावर मराठवाड्यातील यानिमित्ताने तिसऱ्या व्यक्तीची निवड झाली आहे. पहिल्यांदा ही संधी बीडचे काँग्रेस नेते सुंदरराव सोळंके यांना 1978 ते 1980 या काळात मिळाली होती. त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री, तर सोळंके उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर 1995 ते 1999 या काळात भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी या पदाला न्याय दिला. त्यानंतर अनेक वर्षे हे पद पश्चिम महाराष्ट्राकडे राहिले. छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते-पाटील, आर. आर. पाटील, अजित पवार, देवेंद्र फडणवीस आदी नेत्यांनी हे पद भूषविले. आता सुनेत्रा पवार पश्चिम महाराष्ट्रातील असल्या तरी माहेर मराठवाड्याला मोठा मान मिळाला आहे.