सोलापूरकडे जाणाऱ्या मार्गावरील जुन्या पुलाला डाव्या बाजूने मोठा तडा गेला आहे Pudhari
धाराशिव

Solapur Hyderabad Highway | सोलापूर–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या पुलाला मोठा तडा; वाहनचालकांचा जीव धोक्यात घालून प्रवास

Dharashiv News | महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अनेक वर्षांपासून अत्यंत संथ गतीने सुरू

पुढारी वृत्तसेवा

NH65 Bridge Condition

उमरगा: जकेकूर (ता. उमरगा) येथील सोलापूर–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील सोलापूरकडे जाणाऱ्या मार्गावरील जुन्या पुलाला डाव्या बाजूने मोठा तडा गेल्याची गंभीर बाब समोर आली आहे. पुलाच्या संरचनेला पडलेली ही लांबलचक भेग भविष्यात मोठ्या दुर्घटनेचे कारण ठरू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.

या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अनेक वर्षांपासून अत्यंत संथ गतीने सुरू आहे. अद्यापही काम अपूर्ण असून नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी रस्ता खचलेला असून खोल खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. दिशादर्शक फलकांचा अभाव, अपूर्ण सुरक्षितता उपाययोजना आणि निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण यामुळे वारंवार अपघात घडत आहेत. यात अनेकांनी जीव गमावला असून काहीजण कायमचे जायबंदी झाले आहेत.

या मार्गावर रात्रंदिवस बस, ट्रक, खासगी वाहने, टमटम, ऑटो व दुचाकींसह हजारो वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे पुलावरील तडा अधिक धोकादायक मानला जात आहे. काही ठिकाणी नवीन पुलांचे बांधकाम झाले असले तरी काही जुन्या पुलांची केवळ डागडुजी करून त्यांना सिमेंट काँक्रीटचा मुलामा देण्यात आला आहे. जकेकूर तलावाजवळील या जुन्या पुलालाच सध्या मोठी भेग पडली आहे.

दरम्यान, महामार्गाच्या कामाबाबत आणि बंद असलेल्या पथदिव्यांबाबत यापूर्वी अनेकदा रास्तारोको, निवेदने, उपोषणे तसेच आढावा बैठका घेण्यात आल्या. काही वेळा टोलवसुलीही बंद पाडण्यात आली होती. मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून ठोस कार्यवाहीऐवजी केवळ आश्वासने देण्यात आली, असा आरोप स्थानिकांकडून होत आहे. गेल्या महिनाभरापासून पुलावरील तडा स्पष्ट दिसत असतानाही दुरुस्तीचे काम हाती घेतलेले नाही. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामांविरोधात यापूर्वीही आंदोलन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी पथदिवे बंद अवस्थेत आहेत. तात्काळ पुलाची दुरुस्ती व बंद पथदिवे सुरू करण्याबाबत उपाययोजना कराव्यात, अन्यथा मोठी दुर्घटना अटळ ठरू शकते, अशी मागणी बाबा जाफरी (तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, उमरगा) यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT