Solapur Hyderabad highway accident
अणदूर: सोलापूर - हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर अणदूर (ता.तुळजापूर) येथील चिवरी पाटी येथे क्रुझर (एम एच २४ व्ही ४९४८) गाडी पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात ३ महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर सात ते आठ प्रवासी जखमी झाले. ही घटना आज (दि. २२) सकाळी घडली.
अपघातातील साक्षी बडे, सोनाली कदम, पूजा शिंदे अशी मृतांची नावे आहेत. तर आकाश कदम, हरीकृष्ण शिंदे, माऊली कदम, अंजली आमराळे, ओमकार शिंदे, रुद्र शिंदे, कुणाल शिंदे, श्लोक शिंदे, बालाजी शिंदे, शिवांश कदम, कार्तिक आमराळे (रा.उळे, जि. सोलापूर ) अशी जखमींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूरकडून अणदूरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या क्रुझर गाडी पलटी झाली. यात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला. काही जखमींना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात तर किरकोळ जखमींना नळदुर्ग येथील जिल्हा उप रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघात इतका भीषण होता की, भाविक रस्त्याच्या ३० ते ४० फूट दूरवर जाऊन पडले. गाडीचा चक्काचूर झाला आहे. गाडीमधील सर्व प्रवासी जखमी झाले आहेत. पलटी झालेल्या गाडीतून स्थानिक नागरिकांनी जखमींना बाहेर काढले. यामध्ये अनेकांना मोठ्या प्रमाणावर दुखापत झाल्याने त्यांना तत्काळ पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. जखमींपैकी तीन ते चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व प्रवासी सोलापूर जिल्ह्यातील उळे या गावातील असून ते देवदर्शनासाठी सोलापूर वरून निघाल्याचे समजते.