शिवकालीन ते ब्रिटिशकालीन वस्तूंचा अनोखा ठेवा जतन  pudhari photo
धाराशिव

Shivkalin Historical Collection : शिवकालीन ते ब्रिटिशकालीन वस्तूंचा अनोखा ठेवा जतन

कळंब : चित्रकार जयवंत तांबारे यांचा दुर्मीळ ऐतिहासिक ठेवा चर्चेत

पुढारी वृत्तसेवा

कळंब : ऐतिहासिक वारसा, संस्कृती आणि मानवी इतिहासाचे जतन करणाऱ्या संग्रहालयांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्याविषयी जनजागृती करणे या उद्देशाने होणारे दुर्मिळ वस्तूंचे संग्रह हे नेहमीच चर्चेत असतात. याच पार्श्वभूमीवर कळंब तालुक्यातील आंदोरा गावचे प्रसिद्ध चित्रकार जयवंत तांबारे यांनी जतन केलेला दुर्मीळ ऐतिहासिक ठेवा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

जयवंत तांबारे यांनी ऐतिहासिक, कलात्मक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेल्या तब्बल एक हजारांहून अधिक पुरातन वस्तूंचा संग्रह जतन करून ठेवला आहे. या वस्तूंमध्ये किमान शंभर वर्षांहून अधिक जुना इतिहास दडलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शिवराई नाणी, शंभूराई नाणी, मोगलकालीन आणि निजामकालीन नाणी, निजामकालीन दस्तावेज, तलवारी, कट्यारी, ढाली, वाघनखे, भाले, बिचवे, फरशी कुऱ्हाडी, नक्षीदार पितळी आडकित्ते, अंगवस्त्रे, तोफगोळे, तांबे-पितळेच्या वस्तू, मोडीतील शिवकालीन, पेशवेकालीन आणि आंग्लकालीन दस्तऐवज, पत्रव्यवहार, हस्तलिखिते, मशाली, घंटा, अत्तरदाण्या, ब्रिटिशकालीन नाणी व नोटा, दुर्बिणी, वजन-मापे, लाकडी व दगडी नक्षीकामाच्या वस्तू, मूर्ती, तीन किलो वजनाचे ऐतिहासिक कुलूप, पुरातन चांदी-रुप्याचे दागिने, विविध प्रकारच्या इस्त्र्या, दिवे, खलबत्ते आणि लोलक घड्याळे यांचा समावेश आहे.

हा संग्रह उभारण्यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रासह चेन्नई, विजापूर, बिदर, अहिल्यानगर, कोल्हापूर, नागपूर, कोलकाता, बनारस, ग्वाल्हेर, आग्रा, अहमदाबाद, जयपूर, पंजाब, जम्मू आदी ठिकाणी भ्रमंती केली आहे. सातवाहन काळापासूनचा ऐतिहासिक वारसा जतन करण्याचा त्यांचा प्रयत्न विशेष ठरत आहे. नव्या पिढीला ग्रामीण संस्कृती आणि इतिहासाची ओळख व्हावी हा या संग्रहामागील मुख्य उद्देश असल्याचे जयवंत तांबारे यांनी सांगितले. ते सध्या मुंबईतील एका आंतरराष्ट्रीय जाहिरात कंपनीत आर्ट डायरेक्टर आणि क्रिएटिव्ह म्हणून कार्यरत आहेत. तरीही गावाशी असलेली नाळ जपत त्यांनी जुन्या वस्तूंचे महत्त्व लोकांना समजावून सांगण्याचे कार्य सुरू ठेवले आहे.

मुंबईतील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ‌‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट‌’चे ते पदवीधर असून महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे दोन राज्य पुरस्कार, विविध शैक्षणिक संस्थांचे बारा राज्य पुरस्कार, तीन राष्ट्रीय आणि सात आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. विविध सामाजिक संस्थांकडूनही त्यांना कला गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.भविष्यात मोठे ऐतिहासिक संग्रहालय उभारण्याचा मानस असून अडगळीत पडलेल्या दुर्मीळ वस्तू संग्रहासाठी देण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.

संग्रहालये ही केवळ जुन्या वस्तू ठेवण्याची ठिकाणे नसून ती सांस्कृतिक देवाणघेवाण, ज्ञानाचा प्रसार आणि मानवी इतिहासाचा जिवंत दस्तऐवज असल्याची जाणीव समाजात निर्माण होणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय संग्रहालय परिषदेने 1977 मध्ये जागतिक संग्रहालय दिनाची सुरुवात केली होती. विद्यार्थी आणि संशोधकांसाठी संग्रहालये ही ज्ञानाचा अमूल्य ठेवा असल्याचे मानले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT