धाराशिव : शबरी आवास योजनेंतर्गत आदिवासी पारधी समाजाच्या घरकुल व वस्ती विकासासंदर्भात जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आदिवासी पारधी समाजाच्या घरकुलांसाठी आवश्यक कागदपत्रे तत्काळ उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी श्री. पुजार यांनी दिली.
या बैठकीस आदिवासी पारधी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनील काळे, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा क्रीडा अधिकारी अक्षय बिरादार, आर. पी. कोलगणे, धाराशिव तहसीलदार डॉ. मृणाल जाधव, परंडा तहसीलदार निलेश काकडे, धाराशिव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी निता अंधारे, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी धनंजय झाकर्डे, दत्ता बीरू काळे आदी उपस्थित होते.
यावेळी शहरी शबरी घरकुल योजनेंतर्गत माहिती देण्यात आली. धाराशिव शहरातील पारधी वस्तीमधील 44 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी 43 घरकुले पूर्ण झाली आहेत, तर एक घरकुल प्रगतीपथावर आहे. सन 2024-25 मध्ये प्राप्त 345 प्रस्तावांपैकी 244 घरकुले पूर्ण झाली असून 101 घरकुले सुरू आहेत.
तसेच पापनास नगर येथील पारधी वस्तीसाठी 8-अ उतारे, पाणीपुरवठा, खुली व्यायामशाळा, इनडोअर जिम, सौरऊर्जा पॅनेल, रस्ते विकास व घरकुलांसाठी वाळू उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली. भूम शहरातील पारधी समाजासाठी जागा व बांधकाम साहित्य उपलब्ध करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
दरम्यान, या कार्यक्रमात आदिवासी पारधी समाजातील डॉ. दीपक नीळकंठ पवार व प्रख्यात वकील शंकर धनाजी काळे यांचा जिल्हाधिकारी श्री. पुजार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.