Rs 51,000 assistance to school without spending on death anniversary
परंडा, पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील वाटेफळ गावचे रहिवासी युवा उद्योजक महादेव जाधव यांनी सामाजिक बांधिलकी जपत प्रेरणादायी उपक्रम राबविला आहे. दरवर्षी वडील हरिदास जाधव यांच्या पुण्यतिथीनिमित्त होणारा अनाठायी खर्च टाळून यंदा त्यांनी जि. प. प्राथमिक शाळेला तब्बल ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली.
सदर रक्कम शाळेतील शैक्षणिक साहित्य खरेदी, गरजू विद्यार्थ्यांच्या शालेय गरजा भागविणे तसेच मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी वापरण्यात येणार आहे. या मदतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पालक व ग्रामस्थांनीही या उपक्रमाचे स्वागत केले.
"शिक्षण हाच खरा समाजपरिवर्तनाचा पाया आहे," हा संदेश देत जाधव कुटुंबियांनी समाजापुढे आदर्श ठेवला आहे. ही मदत महादेव जाधव यांच्या मातोश्री कमलबाई जाधव यांच्या हस्ते जि. प. प्राथमिक शाळेकडे सुपूर्द करण्यात आली.
ग्रामस्थांच्या उपस्थितीत साध्या व सन्मानपूर्वक पद्धतीने निधी हस्तांतरित पुण्यतिथीसारख्या प्रसंगी दिखाऊ खर्च करण्याऐवजी समाजोपयोगी कार्यासाठी निधी देण्याची ही कृती इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. या उपक्रमाची वाटेफळसह परिसरात सर्वत्र चर्चा होत असून जाधव कुटुंबीयांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले जात आहे. करण्यात आला.