Roofs blown off schools and homes; extensive damage in Vashi Taluka.
वाशी, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात रविवारी सायंकाळी सुमारे पाच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला. मात्र या पावसाने दसमेगावसह परिसरातील अनेक गावांमध्ये मोठे नुकसान झाले आहे.
वादळी वाऱ्यामुळे दसमेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीचे तसेच अनेक घरांचे पत्रे उडून गेले. दसमेगाव, पिंपळगाव, पारा, कळंब रोड, गोजवडा, झिन्नर, घोडकी आदी गावांमध्ये रस्त्याच्या कडेला अस लेली झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. पारा परिसरात मोहोळकर यांच्या ट्रॅक्टरवर झाड कोसळून ट्रॅक्टरचे नुकसान झाले. इंदापूर परिसरासह तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
दसमेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या सहा खोल्यांवरील लोखंडी अँगल व पत्रे वाऱ्याच्या तीव्र झोतामुळे सुमारे दोनशे मीटर अंतरावर जाऊन पडले. मोठी झाडेही उन्मळून पडली. शाळेतील कागदपत्रे पावसामुळे भिजून नुकसान झाले. ग्रामपंचायतीवरील सौरपॅनलही वाऱ्याच्या तडाख्याने तुटून दूर फेकले गेले. सोमवारी शाळेच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विविध मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.
यामध्ये भैरवनाथ शुगर वर्क्सचे उपाध्यक्ष केशव सावंत, जिल्हा परिषद गटनेते विकी चव्हाण, नगरपंचायतीचे गटनेते नागनाथ नाईकवाडी, सुनील उंदरे, पंचायत समिती उपसभापती नितीन रणदिवे, तहसीलदार प्रकाश म्हेत्रे, गटविकास अधिकारी ओंकार गायकवाड, गटशिक्षणाधिकारी सोमनाथ घोलप तसेच जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग (कळंब) येथील कर्मचारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी नुकसानीचा पंचनामा करून पुढील कार्यवाहीसाठी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुहास नन्नवरे, सरपंच पोपट मोरे व शिक्षक उपस्थित होते.