सोने महागले; धोंड्याच्या जेवणातील अंगठी झाली गायब pudhari photo
धाराशिव

Gold price rise : सोने महागले; धोंड्याच्या जेवणातील अंगठी झाली गायब

नवीन कपडे, आमरस-पुरणपोळीवरच जावयाला दिला जातोय निरोप

पुढारी वृत्तसेवा

अतुल शिनगारे

धारूर ः गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरांनी विक्रमी उच्चांक गाठल्याने सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. वाढत्या महागाईमुळे आधीच कुटुंबाचा खर्च सांभाळताना नागरिकांची दमछाक होत असताना आता पारंपरिक सण-समारंभही अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. विशेषतः धोंड्याच्या महिन्यात जावयाला दिली जाणारी सोन्याची अंगठी किंवा दागिन्यांची परंपरा यंदा धारूर तालुक्यातील अनेक घरांत मोडीत निघाल्याचे चित्र दिसून येत आहे.

धारूर तालुक्यात ग्रामीण भागात धोंड्याच्या महिन्यात जावयाला सासरी बोलावून आदरातिथ्य करण्याची परंपरा आहे. यावेळी नवीन कपडे, सोन्याची अंगठी किंवा अन्य भेटवस्तू देण्याची पद्धत अनेक ठिकाणी आजही कायम आहे. मात्र यंदा सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे अनेक कुटुंबांनी सोन्याची खरेदी टाळल्याचे दिसून येत आहे.

काही आर्थिकदृष्ट्‌‍या सक्षम कुटुंबांकडून जावयासाठी सोन्याची अंगठी व अन्य भेटवस्तू खरेदी केली जात असली, तरी बहुतांश मध्यमवर्गीय व सर्वसामान्य कुटुंबांनी खर्चाला कात्री लावल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी जावयाला केवळ नवीन कपडे देऊन आमरस, पुरणपोळी व पारंपरिक जेवणाचा पाहुणचार करून निरोप दिला जात आहे.

सोने दररोज महाग होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पूर्वी धोंड्याच्या जेवणात जावयाला अंगठी देणे ही प्रतिष्ठेची बाब मानली जायची; मात्र आता परिस्थिती बदलली असून परंपरा जपणे कठीण झाले आहे, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली.

सराफा व्यवसायावरही परिणाम

बाजारपेठेतही सोन्याच्या खरेदीत घट झाल्याचे सराफ व्यावसायिक सांगत आहेत. अनेक ग्राहक दागिने खरेदी करण्याऐवजी केवळ चौकशी करून परत जात असल्याचे चित्र आहे. वाढत्या महागाईमुळे पारंपरिक सण-समारंभांतील खर्च कमी करण्याकडे नागरिकांचा कल वाढत असल्याचे दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT