Republic Day School Book Donation: प्रजासत्ताक दिनानिमित्त गावाशी नातं जपणारा आणि शिक्षणाच्या माध्यमातून पुढच्या पिढीला घडवण्याचा प्रयत्न करणारा एक प्रेरणादायी उपक्रम धाराशिवमधील कनगरा गावात पार पडला. बालाजी उत्तम इंगळे आणि भाई अविनाश इंगळे (पुस्तकवाला भाई) यांनी आपल्या गावातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेसाठी जवळपास 25 हजार रुपयांची पुस्तके आणि पुस्तकांचे रॅक भेट दिले.
या उपक्रमानिमित्त शाळेत विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेचे मुख्याध्यापक काकासाहेब माने सर, नितीन इंगळे सर आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांनी या कार्यक्रमाचे अत्यंत देखणे आणि शिस्तबद्ध नियोजन केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन इंगळे सर यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने झाली. प्रास्ताविक करताना अविनाश इंगळे (पुस्तकवाला भाई) यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व अतिशय सोप्या भाषेत उलगडून सांगितले. भारतात 26 जानेवारी 1950 पूर्वी विविध संस्थानांची राजेशाही व्यवस्था कशी होती, स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधानाची निर्मिती कशी झाली आणि लोककल्याणकारी राज्य उभं करण्यासाठी संविधान किती महत्त्वाचं आहे, याचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. यासोबतच मराठी शाळा, मातृभाषेतून शिक्षण आणि वाचनसंस्कृती जपण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
यानंतर कवी, लेखक व दिग्दर्शक हृदय मानव अशोक यांनी संविधानिक मूल्ये जोपासणाऱ्या कविता सादर केल्या. त्यांच्या कविता लहान मुलांना सहज समजतील अशा भाषेत होत्या. त्यामुळे मुलांनी त्या उत्साहाने ऐकल्या आणि कार्यक्रमात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली.
कार्यक्रमाच्या मुख्य वक्त्या संविधान संवादक शितल यशोधरा यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत भारतीय संविधानाची ओळख करून दिली. संविधानाची प्रास्ताविका, संविधानाची गरज, मूलभूत मूल्ये, आम्ही भारताचे लोक, सार्वभौमत्व, समाजवाद, समता, वैज्ञानिक दृष्टिकोन यांसारख्या संकल्पना त्यांनी उदाहरणांसह, अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितल्या. जवळपास दीड तास चाललेल्या या संवादात मुलांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने झाला. नितीन इंगळे सर यांनी या उपक्रमासाठी योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांचे आभार मानले. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अजय गायकवाड, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष महेश धाराव, उपाध्यक्ष सतीश गुंड, आजी-माजी पदाधिकारी, मुख्याध्यापक काकासाहेब माने सर, शिक्षकवृंद, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना संविधान, वाचन आणि शिक्षणाचे महत्त्व समजले. प्रजासत्ताक दिनानिमित्त राबवलेला हा उपक्रम गावासाठी आणि शाळेसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.