Rohit Pawar and soybean farmers File Photo
धाराशिव

Rohit Pawar: धाराशिवमध्ये रोहित पवारांकडून पीक पाहणी; दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

आमदार रोहित पवार यांनी रविवारी रत्नापूर येथील शेतांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन सोयाबीन पिकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधला.

पुढारी वृत्तसेवा

Rohit Pawar

रत्नापूर: कळंब तालुक्यातील रत्नापूर परिसरात पावसाने ओढ दिल्याने सोयाबीनसह खरीप पिकांची अवस्था गंभीर झाली आहे. पावसाअभावी शेतातील उभे सोयाबीन पीक सुकून करपण्यास सुरुवात झाली असून, डोळ्यादेखत हातातोंडाशी आलेले पीक जळताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत असून, शासनाने तातडीने दखल घेऊन मदत करावी, अशी मागणी होत आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी रविवारी रत्नापूर येथील शेतांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन सोयाबीन पिकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधून पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती, पिकांचे नुकसान आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

पावसाअभावी अनेक शेतांमधील सोयाबीन पीक सुकून करपल्याचे पाहणीदरम्यान दिसून आले. मशागत, बियाणे, खते, औषधांसह पिकासाठी मोठा खर्च करूनही पाऊस न झाल्याने उत्पादन हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. पिकांची अवस्था पाहताना अनेक शेतकऱ्यांनी आमदार पवार यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या.

“डोळ्यादेखत शेतकऱ्यांचे सोयाबीन जळत आहे आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. ही परिस्थिती अत्यंत वेदनादायी आहे. रत्नापूर परिसरातील सोयाबीनसह इतर खरीप पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने दुष्काळ जाहीर करावा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ५० हजार रुपये एकरी मदत द्यावी. गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीच्या पीकविम्याची रक्कम अद्याप मिळाली नसलेल्या शेतकऱ्यांना विम्याचे पैसे तातडीने द्यावेत. येत्या पाच दिवसांत चारा छावण्या सुरू कराव्यात. तसेच शेतकऱ्यांच्या मुलांच्या शैक्षणिक शुल्कात सवलत देऊन त्यांना मदत करावी,” अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

“शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केल्यानंतर पावसाअभावी पिकांची झालेली दयनीय अवस्था स्पष्टपणे दिसून येत आहे. केवळ कागदोपत्री आढावा घेऊन चालणार नाही. शासनाने प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा,” असेही आमदार पवार म्हणाले.

पावसाने आणखी ओढ दिल्यास परिसरातील खरीप पिकांचे नुकसान वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने तातडीने नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रताप पाटील, कळंब तालुकाध्यक्ष तुषार वाघमारे, रत्नापूर येथील अविनाश जाधवर, दुधळवाडी येथील गोविंद मुंडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT