Rains gave life to crops, rains have been present in Dharashiv district for four days
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा मे महिन्यात दमदार हजेरी लावलेल्या पावसाने जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर अचानक दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडले होते. गेल्या चार दिवसांपासून मात्र चिंतेचे ढग वरुणराजाने पळवून लावत पिकांना जीवदान दिले आहे.
८ ते ९ जूनच्या सुमारास पावसाने हुलकावणी दिल्याने अनेकांनी पेरण्या उरकूनही पिके सुकायला लागली होती. काहींच्या माळ-रानावरील पिकांचे पूर्णतः नुकसान झाले आणि दुबार पेरणीचे संकट उभे राहिले. मे महिन्यात साधारण २८० मिमी पावसाची नोंद झाल्याने सुरुवातीला काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. मात्र, त्यानंतर दीर्घ पावसाळी खंडामुळे जमिनीतील ओलसरपणा कमी होऊन पिके कोमेजू लागली. शेतकरी हवालदिल झाले आणि खरीप हंगामाचे भवितव्य अंधारात जात असल्याचे चित्र होते.
मात्र गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. या नव्या पावसाळी सरींमुळे पुन्हा एकदा शिवारात चैतन्य पसरले आहे. ओढे, नाले बाहू लागले असून, येडशी येथील धबधबाही वाहू लागला आहे. या पावसामुळे सोयाबीन, ऊस आणि इतर खरीप पिकांना मोठा आधार मिळाला आहे. त्यामुळे सुकून चाललेल्या पिकांना नवजीवन मिळाले असून बळीराजामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या पावसामुळे दुबार पेरणीची शक्यता टळली असून शेतकरी पुन्हा उत्साहाने शेती कामांना लागले आहेत. जमिनीला नव्याने ओल मिळाल्याने पिकांच्या वाढीला चालना मिळाली आहे.
आता खरीप हंगाम खर्या अर्थाने फुलणार, अशी आशा बळीराजाला वाटत आहे. शेतीसाठी आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना या पावसाने दिलासा दिला असून हवामानाची साथ अशीच राहिल्यास या वर्षी चांगले उत्पादन मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
मिलीमीटरमध्ये असा. (कंसात आजपर्यंत झालेला पाऊस) धाराशिव २७.६ (१७९.२), तुळजापूर - २२.३ (२६३.९), परंडा २१.३ (१५०.७), भूम ३४.७ (१८३.६), कळंब -२६.३ (१९५.५), उमरगा २८.६ (२७८.६), लोहारा २९.३ (३२७.७), वाशी ४४.५ (२६८.५). जिल्ह्यात मागील २४ तासांत २७.३ मिमी पावसाची नोंद झाली असून वाषिर्क सरासरीच्या तुलनेत ३६.६ टक्के नोंद झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६०३.१ मिमी आहे.