Dharashiv Rain : धाराशिवमध्ये ३२ दिवस पाऊस गायब; पिकांचे ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान file photo
धाराशिव

Dharashiv Rain : धाराशिवमध्ये ३२ दिवस पाऊस गायब; पिकांचे ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान

महाराष्ट्रात प्रथमच कृषी विद्यापीठ, आयआयटीसह तज्ज्ञांची बांधावर पाहणी

पुढारी वृत्तसेवा

Rain missing for 32 days in Dharashiv; Over 33 percent loss of crops

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : सलग ३२ दिवस पावसाने दडी मारल्याने धाराशिव जिल्ह्यातील खरीप पिकांची अवस्था गंभीर झाली असून, प्राथमिक पाहणीत पिकांचे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून शासनाला अहवाल सादर करण्यासाठी महाराष्ट्रात प्रथमच पीक पाहणी प्रक्रियेला आधुनिक आणि वैज्ञानिक पद्धतीची जोड देण्यात आली आहे. कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, मुंबई आयआयटी आणि प्रशासकीय तज्ज्ञांच्या संयुक्त पथकाकडून प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी सुरू आहे, अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

पावसाच्या प्रदीर्घ खंडाचा सोयाबीनसह विविध खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. फुले सुकून गळून पडली असून शेंगांची संख्या कमी झाली आहे. अनेक ठिकाणी दाणेही अपेक्षित प्रमाणात भरलेले नाहीत. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष शेतातील परिस्थिती कागदोपत्री नोंदींपेक्षा कितीतरी गंभीर असल्याचे तज्ज्ञांच्या पाहणीतून समोर येत आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ, मुंबई आयआयटीचे तज्ज्ञ सल्लागार तसेच कृषी व महसूल विभागाचे अधिकारी संयुक्तपणे नुकसानीची पाहणी करत आहेत. या पाहणीचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठविण्यात येणार असून, एनडीआरएफ व एसडीआरएफच्या निकषांनुसार नुकसानभरपाई मिळविण्यासाठी त्याचा आधार घेतला जाणार आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनी घाईघाईने पीक काढू नये, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे. पीक कापणी प्रयोगांवर विमा भरपाईचे गणित अवलंबून असल्याने संबंधित यंत्रणेच्या सूचनांनंतरच काढणी करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. पीक कापणी प्रयोग लवकर घेण्यासाठीही पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT