Preparations for a 'Green Dharashiv' in full swing; 35 lakh saplings of 60 species ready
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या 'हरित धाराशिव अभियान २०२६'ची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, सामाजिक वनीकरण विभागाने तब्बल ३५ लाखांहून अधिक दर्जेदार रोपांची निर्मिती करून अभियानाला भक्कम आधार दिला आहे.
मागील वर्षी एकाच दिवशी १७लाख आणि संपूर्ण पावसाळ्यात ३२ लाख रोपांची लागवड करण्यात आली होती. यंदा अतिवृष्टीमुळे रोपवाटिका उभारण्यास विलंब झाला असतानाही सामाजिक वनीकरण विभागाला २५ लाख रोपे तयार करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र स्थानिक तंत्रज्ञानाचा वापर, पॉलीहाऊस उभारणी, कोंबडी खताचा उपयोग आणि विशेष माती मिश्रणाच्या साहाय्याने विभागाने हे उद्दिष्ट मोठ्या फरकाने ओलांडत ३५ लाखांहून अधिक गुणवत्तापूर्ण रोपे तयार केली. जिल्ह्यातील १९ रोपवाटिकांमध्ये कडुनिंब, चिंच, पिंपळ, वड यांसह ६० हून अधिक स्थानिक वृक्षप्रजातींची निर्मिती करण्यात आली आहे.
तसेच नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या दुर्मिळ, संकटग्रस्त व संरक्षित (RET) प्रजातींचीही जपणूक करण्यात आली असून, जैवविविधता संवर्धनाच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे. १५ जून ते १५ सप्टेंबरदरम्यान साजऱ्या होणाऱ्या वनमहोत्सवात सामाजिक वनीकरण चालना विभागाच्या सर्व रोपवाटिकांमधून नागरिक, सामाजिक संस्था व शासकीय कार्यालयांना शासकीय दरात रोपे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
'हरित धाराशिव अभियान २०२६'मुळे वृक्षसंवर्धनास मिळण्याबरोबरच पर्यावरण संतुलन, जैवविविधतेचे संरक्षण आणि भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले जाणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.