Police Bust Gang Stealing Sheep from Moving Trucks
रत्नापूर : पुढारी वृत्तसेवा धुळे-सोलापूर महामार्गावरून पहाटेच्या वेळी जाणाऱ्या चालत्या ट्रकमधून मेंढ्या चोरून नेणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चोरीस गेलेल्या मेंढ्या आणि त्यांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेले टमटम वाहन असा एकूण ३ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपी मात्र अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, २३ मे २०२६ रोजी पहाटे येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत धुळे-सोलापूर महामार्गावरून जाणाऱ्या एका ट्रकमधून अज्ञात चोरट्यांनी मेंढ्या काढून चोरून नेल्या होत्या. ही घटना समजताच पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी तात्काळ तपासाची सूत्रे हलवली.
घटनेचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, आरसीपी पथक क्रमांक १ आणि क्यूआरटी पथक यांना रवाना करण्यात आले. पोलिसांनी येरमाळा हद्दीतील महामार्ग परिसरात तपास सुरू केला. यावेळी गोपनीय बातमीदारामार्फत पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. तेरखेडा येथील लक्ष्मी पारधी पिढी आणि उमरा पारधी पिढी येथील काही इसमांनी पहाटेच्या वेळी महामार्गावरून जाणाऱ्या चालत्या ट्रकमधून मेंढ्या चोरी करून आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
तसेच चोरीच्या मेंढ्या उमरा पिढी जवळील एका बाभळीच्या झाडाखाली उभ्या असलेल्या लाल रंगाच्या टमटममध्ये असल्याचे समजले. माहिती मिळताच पोलिसांनी येरमाळा पोलीस ठाण्याचे सपोनि तात्याराव भालेराव यांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल संतोष तिघाडे व संदीप चौघुले यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता माहितीप्रमाणे लाल रंगाचे टमटम बाभळीच्या झाडाखाली उभे दिसले. टमटमच्या बाजूला ७ ते ८ इसम बसलेले होते. मात्र पोलिसांची चाहूल लागताच ते सर्वजण पळून गेले. चाहूल लागताच पोलिसांना त्याचा पाठलाग केला, पण अंधार आण परिसराचा फायदा घेत आरोपी पसार होण्यात यशस्वी झाले.
यानंतर पोलिसांनी टमटमची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मेंढ्या आढळून आल्या. फिर्यादीला फोन करून मेंढ्यांचे वर्णन सांगण्यात आले असता त्या चोरीस गेलेल्या मेंढ्याच असल्याचे त्याने ओळखले.
पोलिसांनी मेंढ्या आणि टमटम वाहन असा एकूण ३ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाईसाठी येरमाळा पोलीस ठाण्यात जमा केला आहे. या प्रकरणी आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सचिन खटके, सपोनि तात्याराव भालेराव, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, महिला पोलीस हवालदार शोभा बांगर, पोलीस नाईक संतोष तिघाडे, संदीप चौघुले, रोहित दंडनाईक तसेच आरसीपी पथक क्रमांक १ व क्यूआरटी पथकाने केली.