PM Fasal Bima Yojana pudhari photo
धाराशिव

PM Fasal Bima Yojana : आंबी, पाथरुड मंडळाला पीकविम्याची तुटपुंजी मदत

हेक्टरी अवघे ३ हजार ५०० रुपये मिळाले

पुढारी वृत्तसेवा

ईट : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत २०२५-२६ मधील पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, भूम तालुक्यातील आंबी व पाथूड महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हेक्टरी अवघे ३ हजार ५०० रुपये विमा परतावा मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

गतवर्षी अतिवृष्टी, पावसातील दीर्घ खंड तसेच प्रतिकूल हवामानामुळे तालुक्यातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी शेतजमिनी ओरबाडून गेल्या, तर पिके पाण्यात कुजल्याने उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याच्या परताव्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, आंबी व पाथरुड मंडळाला मिळालेली रक्कम अत्यल्प असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे शेजारील मंडळांतील शेतकऱ्यांना हेक्टरी १५ ते १६ हजार रुपयांपर्यंत विमा परतावा मिळाला आहे. नुकसानाची तीव्रता जवळपास सारखी असतानाही विमा रकमेत एवढी मोठी तफावत का, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.

आंबी मंडळाची अवर्षणग्रस्त म्हणून ओळख असूनही यंदा त्याच मंडळातील शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळाल्याने नाराजी वाढली आहे. त्यामुळे विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची भावना व्यक्त होत आहे. विमा परताव्याच्या निकषांची पारदर्शक चौकशी करून योग्य भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT