डॉ. पद्मसिंह पाटील आणि पवनराजे  pudhari photo
धाराशिव

Dharashiv Politics : सख्‍खे चुलतभाऊ बनले पक्‍के वैरी

२००४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर निर्माण झाला दुरावा

पुढारी वृत्तसेवा

भीमाशंकर वाघमारे

धाराशिव : राज्याच्या राजकारणात आणि मंत्रिमंडळात डॉ. पद्मसिंह पाटील व्यस्त असताना, त्‍यांच्‍या उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी त्यांचे सख्खे चुलतबंधू पवनराजे यांच्यावर होती. त्या वेळी जिल्ह्यात डॉ. पाटील यांची एकहाती सत्ता होती. जिल्हा बँक आणि तेरणा साखर कारखानाही त्यांच्या ताब्यात होते.

अर्थात, या दोन्ही संस्थांची जबाबदारी पवनराजेंवर होती. यात गैरव्यवहाराचे आरोप झाले आणि त्यातून या दोन्ही बंधूंमध्ये दुरावा वाढत गेला. पुढे पवनराजेंना अटक झाली. त्यानंतर २००४ ची विधानसभा निवडणूक जाहीर झाली आणि पवनराजेंनी डॉ. पाटील यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून दंड थोपटले. त्या निवडणुकीत डॉ. पाटील अवघ्या ४८४ मतांनी विजयी झाले.

डॉ. पाटील यांचे एकेकाळी जिल्ह्यात तसेच उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघावर असलेले वर्चस्व या निकालामुळे हादरले. त्यातूनच या दोघांतील अंतर अधिक वाढत गेले. अर्थात, या वादासाठी अनेक कारणेही सांगितली जातात. तेरणा कारखान्यातील कथित गैरव्यवहार असो किंवा जिल्हा बँकेतील होम ट्रेड प्रकरण, या घटनांमुळे २००० सालापासूनच दोन्ही बंधूंमध्ये दुरावा निर्माण होण्यास सुरुवात झाली होती, असे जाणकार सांगतात. हे वाद वाढत गेल्यानंतर गैरव्यवहार प्रकरणात पवनराजेंना २००२ मध्ये अटक झाली आणि तेथून नाराजीच्या नाट्याला सुरुवात झाली.

पुढे २००४ मध्ये डॉ. पाटील निवडणुकीच्या रिंगणात असताना पवनराजेंनी अपक्ष म्हणून लढत दिली. त्या वेळी त्यांना मतदारसंघातून मोठा पाठिंबा मिळाला आणि डॉ. पाटील यांचा केवळ ४८४ मतांनी निसटता विजय झाला. पुढे डॉ. पाटील यांच्याबरोबर ताकदीने लढण्यासाठी पवनराजेंनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर ३ जून २००६ रोजी कळंबोली येथे पवनराजेंची गोळ्या झाडून हत्या झाली. या वेळी त्‍यांचा वाहनचालक समद काझी याचीही हत्‍या झाली. त्यानंतर जिल्ह्यातील वातावरण तापले. या खुनाचा अप्रत्यक्ष आरोप डॉ. पाटील यांच्यावर होऊ लागला. पुढे २००९ च्या जून महिन्यात पवनराजे हत्या प्रकरणात सीबीआयने डॉ. पाटील यांना अटक केली.

या दरम्यानच्या काळात जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलत गेली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी डॉ. पाटील यांच्याऐवजी त्यांचे पुत्र राणाजगजितसिंह पाटील यांना राज्यमंत्रीपदाची संधी दिली. त्यानंतर दोन वर्षांनी तेरणा साखर कारखान्याची निवडणूक पार पडली. त्यात सहानुभूतीच्या जोरावर ओमराजेंच्या पॅनेलकडे सत्ता आली आणि डॉ. पाटील यांची अनेक वर्षांची तेरणा कारखान्यावरील सत्ता गेली. त्याचा मोठा फटका पुढील विधानसभा निवडणुकीत आ. राणाजगजितसिंह पाटील यांना बसला. या काळात हत्या प्रकरणातील आरोप आणि अटकेच्या कारवाईमुळे पाटील कुटुंबीय पूर्णपणे बॅकफूटवर राहिले. डॉ. पाटील यांच्यावरील कारवाईमुळे त्यांना राजकीय पातळीवरही मोठी किंमत चुकवावी लागली.

जिल्हा परिषदेतही राष्ट्रवादी विरोधात बसली. पुढे दहा वर्षे काँग्रेस-शिवसेना युतीने जिल्हा परिषदेवर सत्ता राखली. पवनराजे हत्या प्रकरणानंतर ओमप्रकाश राजेनिंबाळकर २००९ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून विजयी झाले. त्यांनी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील यांचा पराभव केला होता. आता या प्रकरणाचा २० वर्षांनंतर निकाल लागला असून सर्व आरोपी निर्दोष मुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय दिशा बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

असायचा प्रचाराचा मुख्य मुद्दा

२००६ नंतर आजपर्यंत झालेल्या जवळपास प्रत्येक निवडणुकीत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी पवनराजे हत्या प्रकरणाचा मुद्दा सातत्याने उपस्थित केला. किंबहुना विरोधी पक्षाकडूनही हा मुद्दा कायम लावून धरला गेला. त्यामुळे २००९ च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. पाटील यांना जिल्ह्यातून अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. केवळ बार्शी विधानसभा मतदारसंघातील मताधिक्याच्या जोरावर ते विजयी झाले होते. त्यानंतर त्यांना अटकही झाली. परिणामी २०१४ च्या निवडणुकीत डॉ. पाटील यांचा दणदणीत पराभव झाला. त्या वेळी त्यांच्या विरोधातील प्रचाराची मुख्य धुरा ओमराजेंनी सांभाळत प्रा. रवी गायकवाड यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.

असे आहे नाते

डॉ. पद्मसिंह पाटील व (कै.) पवन राजेनिंबाळकर हे दोघेही सख्‍खे चुलत बंधू. या दोघांच्‍याही आजोबांचे नाव भूपालसिंह राजेनिंबाळकर. पवनराजेंच्‍या वडिलांचे नाव संताजीराव तर डॉ. पाटील यांच्‍या वडिलांचे नाव बाजीराव. बाजीराव हे तेरचे पाटील भगवंतराव पाटील यांच्‍या घरात दत्तक गेले. त्‍यामुळे ते डॉ. पद्मसिंह यांचे आडनाव पाटील आहे. दोघे चुलतबंधू असतानाही वेगवेगळी आडनाव असल्‍याने अनेकांचा गोंधळ उडतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT