परंडा : शहरातील दैनंदिन तसेच आठवडे बाजाराचा ठेका ई लिलावाने देण्याचा ठराव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज बहुमताने घेण्यात आला.
नगरपरिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष झाकीर सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेस मुख्याधिकारी मनीषा वड्डेपल्ली, कार्यालय अधीक्षक जगदीश सोंडगे, मुनीर जिकरे यांच्यासह सत्ताधारी व विरोधी नगरसेवक उपस्थित होते. सभेत विविध विषयांवर चर्चा करून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
सभेच्या सुरुवातीला मागील सभेचे इतिवृत्त व विषय अहवाल वाचून कायम करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी नगरपरिषदेच्या विविध विभागांना आवश्यक असणाऱ्या साहित्य व सेवा पुरवठ्यासाठी निविदा मागविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. भांडार विभाग, पाणीपुरवठा विभाग, बांधकाम विभाग, लेखा विभाग तसेच इतर विभागांसाठी आवश्यक साहित्य खरेदी व सेवा पुरविण्यासाठी वार्षिक निविदा काढण्यास एकमताने मंजुरी देण्यात आली.
या ठरावाचे सूचक रमेशसिंह परदेशी तर अनुमोदक सत्तार गुलाब खान पठाण होते. दरम्यान, सन 2026-27 या आर्थिक वर्षातील दैनंदिन व आठवडी बाजाराच्या लिलावाचा विषय सभेसमोर आला. उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, नगरसेवक रमेशसिंह परदेशी, अनिल शिंदे व परवीन मन्नान बासले यांनी बाजाराचा लिलाव न करता नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून कर वसुली करण्याची मागणी केली.
मात्र, नगरपरिषदेकडे आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने कर्मचाऱ्यांकडून वसुली करणे व्यवहार्य नसल्याचा अभिप्राय मुख्याधिकारी मनिषा वड्डेपल्ली यांनी मांडला. विरोधी नगरसेवकांनी ठेकेदारांकडून विक्रेत्यांची पिळवणूक होत असल्याची हरकत घेतली. त्यावर नगराध्यक्ष झाकीर सौदागर यांनी शासनाच्या संकेतस्थळावर जाहीर ई-लिलाव प्रसिद्ध करून नियमांनुसार ठेका देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले.
या विषयावरील ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. ठरावाचे सूचक चंद्रकांत नाना गायकवाड तर अनुमोदक मन्नाभी मतीन जिनेरी होते.तसेच महादेव दगडू ओव्हाळ यांना शासनाच्या निर्देशानुसार सेवानिवृत्ती वेतन व इतर लाभ देण्यास सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली.