Diwali 2026 : पंडित पुरुषोत्तम जोशी यांच्या शास्त्रीय गायनाने रसिक मंत्रमुग्ध file photo
धाराशिव

Diwali 2026 : पंडित पुरुषोत्तम जोशी यांच्या शास्त्रीय गायनाने रसिक मंत्रमुग्ध

दिवाळीच्या मंगलमय पहाटे सुरेल स्वरांची मेजवानी अनुभवण्याची संधी धाराशिवकरांना मिळाली.

पुढारी वृत्तसेवा

Pandit Purushottam Joshi’s classical vocal recital leaves the audience spellbound

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : दिवाळीच्या मंगलमय पहाटे सुरेल स्वरांची मेजवानी अनुभवण्याची संधी धाराशिवकरांना मिळाली. उज्वल निर्माण फाउंडेशनच्या वतीने आयोजित दिवाळी पहाट संगीत मैफिलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पहाटेच्या शांत आणि प्रसन्न वातावरणात पं. पुरुषोत्तम जोशी यांच्या छोटा ख्याल, अभंग आणि नाट्यसंगीताच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले.

कार्यक्रमाची सुरुवात राग भैरवमधील छोट्या ख्यालाने झाली. त्यानंतर संत एकनाथ महाराजांचा 'ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था', संत तुकाराम महाराजांचा 'येई गा तू मायबापा' आणि 'माझे माहेर पंढरी' या अभंगांनी मैफिलीला भक्तिरसाची उंची प्राप्त करून दिली. 'ओम नमो हा सूर जिथे रंगतो' या गीतालाही रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

'अवघे गरजे पंढरपूर', 'उठी उठी गोपाला', 'नारायणा रमा रमणा' यांसह विविध नाट्यगीतांचे सादरीकरण विशेष रंगले. पं. पुरुषोत्तम जोशी आणि कन्या रागिणी जोशी यांनी 'उठी उठी गोपाला' हे गीत अप्रतिम सादर केले. यावेळी हार्मोनियम, बासरी आणि पखवाज यांची जुगलबंदी हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.

पं. दीपक लिंगे यांच्या हार्मोनियम वादनाने वातावरण भारावून गेले. शेवटी 'सजल नयन नीत धार बरसती' या भैरवीने मैफिलीची सांगता झाली. पखवाजवर सुरेश वाघमारे, तबल्यावर प्रदीप सुतार, बासरीवर जगदीश सुतार, टाळवादन अमृत जावळे यांनी साथसंगत केली. तानपुऱ्यावर ऋषभ जोशी आणि रागिणी यांनी साथ दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT