धाराशिव : पंढरपूर-शेगाव नवीन रेल्वेमार्ग मंजूर करण्याची मागणी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली. सोलापूर, धाराशिव आणि बुलढाणा या तीन जिल्ह्यांसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असून, तो लाखो भाविकांच्या श्रद्धेशी निगडित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभेत बोलताना त्यांनी पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व शेगाव गजानन महाराज मंदिर ही राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रे असल्याचे सांगितले. दरवर्षी कोट्यवधी भाविक येथे येतात; मात्र थेट रेल्वे मार्ग नसल्याने प्रवासात अडचणी निर्माण होतात. प्रस्तावित मार्ग पूर्ण झाल्यास प्रवास अधिक सुलभ, जलद व सुरक्षित होईल, तसेच मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्र रेल्वेने जोडले जातील.
हा प्रकल्प केवळ धार्मिक पर्यटनापुरता मर्यादित नसून व्यापार, उद्योग, शेतीमाल वाहतूक व रोजगारनिर्मितीस चालना देणारा ठरेल, असेही त्यांनी नमूद केले. भूम व परंडा तालुक्यातील नागरिकांनी ‘रेल्वे संघर्ष समिती’च्या माध्यमातून सातत्याने लढा उभारला असून सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.दरम्यान, केंद्र सरकारने तातडीने सर्वेक्षणासाठी निधी उपलब्ध करून हा रेल्वेमार्ग मंजूर करावा, अशी मागणी खा. राजेनिंबाळकर यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली.