भाजपचे उमेदवार बसवराज पाटील यांनी काँग्रेसचे महेश देशमुख यांचा ७१९ मतांनी पराभव केला. Pudhari
धाराशिव

Dharashiv MLC Election Result | उस्मानाबाद–लातूर–बीड विधान परिषद निवडणूक : बसवराज पाटील यांचा विजय; महाविकास आघाडीची १२५ मते फुटली

महाविकास आघाडीचा ७१९ मतांनी पराभव

पुढारी वृत्तसेवा

BJP Basavaraj Patil Victory

धाराशिव : विधान परिषदेच्या उस्मानाबाद–लातूर–बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार बसवराज पाटील यांनी काँग्रेसचे महेश देशमुख यांचा ७१९ मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळविला. या निवडणुकीत महाविकास आघाडीची जवळपास १२५ मते फुटल्‍याचेही स्‍पष्‍ट झाले.

मतमोजणीत बसवराज पाटील यांना एकूण ८४४ मते मिळाली, तर महेश देशमुख यांना १२५ मते मिळाली. या निवडणुकीसाठी ४८५ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. पाटील यांनी पहिल्याच फेरीत कोटा पार करत विजय निश्चित केला. मतमोजणी टेबलनिहाय पाहता, बसवराज पाटील यांना टेबल क्रमांक १ वर १८४, टेबल क्रमांक २ वर १४४, टेबल क्रमांक ३ वर १९१, टेबल क्रमांक ४ वर १७७ आणि टेबल क्रमांक ५ वर १४८ मते मिळाली. दुसरीकडे काँग्रेसचे महेश देशमुख यांना अनुक्रमे १०, ५५, ६, २१ आणि ३३ मते मिळाली.

मतमोजणीदरम्यान १४ मते अवैध ठरली. एकूण ९८३ मतपत्रिका प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ९६९ मते वैध ठरली. निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. ठिकठिकाणी समर्थकांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला. या निकालानंतर बसवराज पाटील यांचे मूळ गाव मुरुम (ता. उमरगा) येथेही कार्यकर्ते, समर्थकांनी जल्‍लोष केला.

महाविकास आघाडीला मोठा धक्का; १२५ मते फुटली

या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार महेश देशमुख यांना केवळ १२५ मते मिळाली. स्थानिक राजकीय समीकरणे आणि अपेक्षित एकजूट न झाल्याने विरोधकांच्या मतांमध्ये मोठी घट झाल्याचे चित्र समोर आले आहे. महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांचा अतिआत्‍मविश्‍वास नडला की त्‍यांनी ही निवडणुकच गांभीर्याने घेतली नाही,असा सवाल उपस्‍थित अनेकांनी उपस्‍थित केला.

चौथ्‍यांदा आमदारकीची संधी

बसवराज पाटील हे आजपर्यंत काँग्रेसकडून तीन वेळा आमदार राहिले आहेत. १९९९ मध्‍ये ते उमरगा मतदारसंघातून विजयी झाले. त्‍या वेळी राज्‍यमंत्रीही होते. पुढे २००४ मध्‍ये पराभूत झाले. २००९ व २०१४ मधून ते लातूर जिल्‍ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. २०१९ मध्‍ये ते पराभूत झाले. आता विधान परिषदेवर ते पहिल्‍यांदाच जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT