Online Financial Fraud : Cyber police recovered amount of 19 lakhs; Action by freezing bank accounts
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा: ऑनलाइन आर्थिक फसवणुकीत गमावलेली १९ लाख रुपयांची रक्कम परत मिळवून देण्यात धाराशिव सायबर पोलिसांना यश आले आहे. अणदूर (ता. उमरगा) येथील मोहित सिद्धेश्वर भुजबळ व रोहित सिद्धेश्वर भुजबळ या दोघांची ऑनलाइन माध्यमातून अनुक्रमे १४ लाख व ५ लाख रुपयांची फसवणूक झाली होती.
याप्रकरणी दोन्ही भावांनी राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल प्रणाली (एनसीसीआर) पोर्टलवर ऑनलाइन तक्रार दाखल केली होती. तक्रार प्राप्त होताच धाराशिव सायबर पोलिसांनी तत्काळ संबंधित बँकांशी संपर्क साधून फसवणुकीची रक्कम वर्ग झालेली विविध बँक खाती गोठवली. त्यानंतर बँकांच्या नोडल अधिकाऱ्यांशी समन्वय साधून फसवणूक झालेली संपूर्ण १९ लाख रुपयांची रक्कम तक्रारदारांना परत मिळवून देण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन यादव, सपोनि कासुळे यांच्यासह सायबर पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली. दरम्यान, सायबर पोलिसांनी नागरिकांना ऑनलाइन व्यवहार करताना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
अनोळखी मोबाईल क्रमांकावरून आलेले संदेश, लिंक, फोन कॉल किंवा क्यूआर कोडची खात्री केल्याशिवाय बँक खात्याची माहिती, ओटीपी देऊ नये तसेच संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये, असे सांगण्यात आले आहे.