Omraje Nimbalkar  Pudhari
धाराशिव

Omraje Nimbalkar : "रोजचे मरण आम्ही जगतोय..." ; धाराशिवमध्ये दाखल होताच ओमराजे निंबाळकर काय म्हणाले ?

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी आम्हाला उच्च न्यायालयात न्याय मिळेल

पुढारी वृत्तसेवा

Omraje Nimbalkar : "एक कुटुंब प्रमुख नसल्यावर काय यातना होतात त्या आमच्या कुटुंबाने मागील अनेक वर्षे सहन केल्या आहेत. रोजचे मरण आम्ही जगतोय," असे स्‍पष्‍ट करत माझ्या वडिलांच्या झालेल्या हत्येनंतर मी विरोधकांना धडा शिकवण्यासाठी सार्वजनिक जीवनात उतरलो. तुम्ही सुपाऱ्या देऊन राजकीय विरोधक संपवू शकत नाही. नवीन नेतृत्व तयार होतेच हेच मला दाखवून द्यायचे होते. मागील दोन ते तीन दिवस राजकीय वर्तुळात ज्या काही चर्चा सुरू आहेत, आता कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेणार आहे, असा पुनरुच्चार खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज (दि. २१) धाराशिवमध्‍ये दाखल झाल्‍यानंतर केला.

कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच पुढील राजकीय दिशा ठरवणार!

खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवमध्ये दाखल झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "पुढील राजकीय दिशा काय असेल, याचा निर्णय कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतरच जाहीर करणार."

'२० वर्षे १७ दिवस लढा दिला, पण...'

ओमराजे निंबाळकर म्हणाले, "३ जून २००६ रोजी पवनराजे निंबाळकर यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपींच्या दबावामुळे महाराष्ट्र पोलीस योग्य रीतीने तपास करू शकत नव्हते. स्थानिक पोलिसांवर प्रचंड दबाव होता. त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयात दाद मागितली आणि न्यायालयाच्या आदेशानंतर हा तपास 'सीबीआय'कडे (CBI) सोपवण्यात आला. हा तपास महाराष्ट्र पोलिसांकडून सीबीआयकडे जाण्यासाठीच तीन वर्षांचा कालावधी लागला. या खटल्याची सुनावणी तब्बल २० वर्षे १७ दिवस चालली. न्यायालयाने निकालात स्पष्टपणे मान्य केले आहे की, या हत्येमागे राजकीय वैमनस्य आणि हेतू होता. परंतु, तरीही 'पवनराजे निंबाळकर यांची हत्या नक्की कोणी केली?' या मुख्य प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही."

उच्च न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा

आता पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी दिलेल्या निकालाविरोधात सीबीआय उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. "एका कुटुंबाचा प्रमुख गेल्यावर काय यातना सहन कराव्या लागतात, ते आम्ही भोगत आहोत. आम्ही रोजचे मरण जगतोय. पण आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, उच्च न्यायालयात आमच्या कुटुंबाला नक्कीच न्याय मिळेल," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय होणार

"माझ्या वडिलांच्या हत्येनंतर विरोधकांना धडा शिकवण्यासाठीच मी सार्वजनिक आणि राजकीय जीवनात आलो. सध्या अनेक चर्चा सुरू आहेत, परंतु मी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील माझ्या सर्व कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करणार आहे. कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतल्यानंतरच मी माझी पुढील राजकीय दिशा आणि निर्णय जाहीर करेन," असा पुनरुच्चारही त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT