Narali Purnima Yatra Shri Yedeshwari Devi Crowd of devotees in the palanquin procession
येरमाळा, पुढारी वृत्तसेवा: श्री येडेश्वरी देवीची नारळी पौर्णिमा यात्रा मोठ्या उत्साहात साजरी झाली. या यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. देवीच्या पालखीची दहीहंडीसह निघालेल्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने भाविक आले होते.
नारळी पौर्णिमेनिमित्त पारंपरिक दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम दुपारी ४ वाजता दत्तात्रेय बोधले महाराज यांच्या हस्ते पार पडला. यावेळी देवीचे मानकरी अमोल पाटील, यशवंत पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते. श्री येडेश्वरी देवीच्या वर्षातून होणाऱ्या दोन यात्रांपैकी नारळी पौर्णिमेची यात्रा दुसरी मोठी यात्रा मानली जाते.
मंगळागौरीच्या विसर्जनानंतर आनंदधाम विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आयोजित हरिनाम सप्ताहाने यात्रेची सुरुवात होते. पौर्णिमेच्या आदल्या दिवशी देवीची पालखी नगर प्रदक्षिणेसाठी मंदिरात दाखल होते. पौर्णिमेच्या दिवशी गावातील आणि पंचक्रोशीतील भाविक देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून दर्शन घेतात. दहीहंडी फोडण्यापूर्वी भजनी मंडळ, वारकरी मंडळ आणि आराधी मंडळांनी विविध लोककला सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले.
यामध्ये पाऊल, शिवणापाणी, खो-खो, फुगड्या, नकला आणि पोवाड्यांचे सादरीकरण करण्यात आले. यावर्षी पाऊस कमी असल्याने सोयाबीन पिकाच्या शेतातून पालखीची गाव प्रदक्षिणा पार पडली. गेल्या वर्षी पाऊस जास्त असल्यामुळे पालखीच्या मानकऱ्यांना पाण्यातून मार्ग काढावा लागला होता. पालखीच्या मार्गावर गावातील महिलांनी विविध रंगांच्या रांगोळ्या आणि फुलांनी सजावट करून पालखीसाठी पायघड्या घातल्या होत्या. तसेच, पालखीतील परशुरामच्या मूर्तीला कुंकवाचा मळवट भरून मानकऱ्यांच्या पायावर पाणी घालून नैवेद्य दाखवण्यासाठीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती.