उमरगा पुढारी वृत्तसेवा : शहरातील बाह्यवळण रस्त्यालगतच्या खड्ड्यात पंधरा दिवसांपूर्वी मुन्शी प्लॉट येथील रहिवासी अभिषेक कालिदास शिंदे (वय २३) याचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी उमरगा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाल्या नंतर वैद्यकीय अहवाल, पोलीस तपास आणि मयत युवकांच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी, (दि ०९) तीन महिला विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मुन्शी प्लॉट येथील रहिवासी अभिषेक कालिदास शिंदे हा भाड्याने रिक्षा चालवत होता. अभिषेक हा २४ जुलै रोजी सकाळी ऑटो रिक्षा चालवण्यासाठी घरातून गेला. त्यानंतर नऊ वाजता घराकडे आला नाही. घरच्यांनी सर्वत्र दिवसभर शोध घेतला, मात्र त्याचा शोध लागला नाही.
अखेर कुटुंबीयांनी उमरगा पोलिसांत २५ जुलै रोजी अभिषेक हरवल्याची तक्रार दाखल केली. त्याच दिवशी सायंकाळी साडेसातला अभिषेकच्या वडिलांना आरती मंगल कार्यालया नजीक खड्ड्यात अनोळखी मृतदेह पडला असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार जाऊन पाहिले असता तो मृतदेह अभिषेक याचा असल्याची खात्री पटली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनास उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
दरम्यान शवविच्छेदनानंतर नातेवाइकांनी अभिषेक च्या गळा व हातावर जखमेचे व्रण असल्याने मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत पोलिस ठाण्यात ठिय्या दिला. पोलीसांनी नातेवाईकाची समजूत काढल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान वैद्यकीय अहवाल, पोलीस तपास आणि याप्रकरणी अभिषेकचे वडील कालिदास शिंदे यांनी शनिवारी, (दि ०९) रात्री दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा येथील सरोजा चिकुंद्रे, रेणु पवार व अनिता जाधव तिघीही ह.मु. कालिका कला केंद्र, येरमाळा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी रविवारी (दि १०) यातील तीनही महिला आरोपीला अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक श्रीकांत भराटे करीत आहेत.