भूम : बस फलाटावर लागली की प्रवाशांचा असा गराडा पडत आहे.  pudhari photo
धाराशिव

ST bus Staff shortage : दररोज 400 किलोमीटरच्या फेऱ्यांवर पाणी!

भूम आगार : 83 पदे रिक्त, प्रवाशांचे होताहेत हाल

पुढारी वृत्तसेवा

तानाजी सुपेकर

भूम : बसगाड्या आहेत, पण चालक नाहीत कर्मचारी आहेत, पण तेही अपुरे.... एसटीच्या भूम आगारात निर्माण झालेल्या दुहेरी संकटामुळे प्रवासी वाहतूक व्यवस्था अडचणीत सापडली आहे. ऐन लग्नसराई तसेच उन्हाळी सुट्यात अनेक गावांसाठीच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत.

आगारातील तब्बल 83 पदे रिक्त असल्याने चालक-वाहकांवर दुहेरी जबाबदारी टाकली जात आहे. सध्या 112 चालक व 110 वाहक कार्यरत असले तरी 29 चालक आणि 30 वाहकांची कमतरता स्पष्ट आहे. एवढेच नव्हे तर, बस चालविणारेच कर्मचारी आता कार्यालयीन कामेही सांभाळत असल्याने नियमित फेऱ्यांचे नियोजन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

बसगाड्यांची संख्या मर्यादित आणि मनुष्यबळ अपुरे असल्याने दररोज सुमारे 400 किलोमीटर अंतराच्या फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. महिन्याला जवळपास 12 हजार किलोमीटरची सेवा बंद राहत असल्याने प्रवाशांचा संताप वाढत आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या फेऱ्यांना प्राधान्य देताना इतर ग्रामीण मार्गांवरील सेवा ठप्प होत असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, कार्यशाळेतही यांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असल्याने बस तपासणी, दुरुस्ती व देखभाल कामांवर परिणाम होत आहे. परिणामी अनेक गाड्या बंद अवस्थेत पडून आहेत. यामध्ये भर म्हणजे पुढील दोन वर्षांत 29 बस बाद होणार असल्याने परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्हे आहेत.

आगारात चालक-वाहकांची मोठ्या प्रमाणात कमतरता निर्माण झाली असून याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला आहे. सण, सुट्ट्या तसेच ग्रामीण भागातील जत्रांच्या पार्श्वभूमीवर बसफेऱ्या वाढविण्याची गरज असताना कर्मचारी अपुरे असल्याने काही फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत.रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी विनंती केली आहे.
उल्हास शिंगारे आगारप्रमुख, भूम

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT