kolhapur | बहिरेवाडीची लेक होणार कोल्हापूरची महापौर

kolhapur | बहिरेवाडीची लेक होणार कोल्हापूरची महापौर

वारणा परिसरात फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव
Published on

प्रकाश मोहरेकर

वारणानगर : वारणेच्या कुशीत असलेल्या बहिरेवाडी (ता. पन्हाळा) या छोट्याशा गावची लेक रूपाराणी संग्रामसिंह निकम या कोल्हापूरच्या महापौरपदी विराजमान होणार आहेत. याची घोषणा सोमवारी झाल्यानंतर वारणा परिसरात फटाक्यांची अताषबाजी करून आनंद साजरा करण्यात आला.

बहिरेवाडी येथील बाळासाहेब व कांताबाई जाधव या सर्वसामान्य दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या रूपाराणी यांचा जन्म कासेगाव (ता. वाळवा) येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत तर माध्यमिक शिक्षण कोडोली हायस्कूलमध्ये झाले. महाविद्यालयीन शिक्षण वारणा महाविद्यालयात झाल्यानंतर कोल्हापुरातील व्यावसायिक संग्रामसिंह निकम यांच्याशी झाला. सासरे वजनमापे अधिकारी असल्याने निकम कुटुंबीयांनी त्यांचे शिक्षण पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी बी फार्मसीची डिग्री घेतली. लग्नानंतर रूपाराणी यांनी कुटुंबीयांची जबाबदारी यशस्वीपणे पेलत सामाजिक, राजकीय क्षेत्रांत आपल्या कामाचा ठसा उमटविला. त्यांना ऐश्वर्या व रणवीर ही दोन अपत्ये आहेत. निकम घराण्यात राजकीय वारसा नाही मात्र राजकारणाची आवड असल्याने पती संग्रामसिंह यांनी पत्नी रुपाराणी यांना 2015 ला ताराराणी आघाडीतून निवडणूक लढवून विजयी केले. त्यावेळी त्यांना स्थायी सभापतीची संधी मिळाली. धाडसी स्वभाव, अभ्यास व भाषण कौशल्याच्या जोरावर त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखविली. विद्यार्थिदशेपासून रोखठोक बोलत प्रतिनिधित्व करत असत. जिम्नॅस्टिकच्या खेळाडू म्हणूनही त्यांनी राज्यस्तरावर चमक दाखविली आहे.

सध्या त्या भाजपच्या महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा म्हणून काम पाहत होत्या. तसेच सर्वसामान्यांच्या मुलांना विनामोबदला इंग्रजी शिकता यावे म्हणून रॅायल इंग्लिश शाळा सुरु केली आहे. त्यांच्या मतदारसंघात काही मागास समाज असल्याने अवैध दारू विक्री व्यवसाय करायचे. हे व्यवसाय प्रशासन बंद पाडायचे. त्यामुळे समाज अडचणीत होता. येथील सुमारे पाचशे महिलांचे संघटन बांधून कोव्हिड काळापासून महिलांच्या हाताला काम देऊन त्यांनी रोजगार मिळवून दिला. अशा कर्तबगार रुपाराणी निकम यांच्याकडे महायुतीने महापौरपदाची जाबबदारी दिली आहे. बहिरेवाडीसारख्या छोट्याशा खेड्यातील लेकीला राज्यात अग्रेसर असणार्‍या कोल्हापूरच्या महापौर म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याने परिसरातून आनंद व्यक्त करण्यात आला.

कारभार पारदर्शक व विकासाभिमुख करू

माझ्या यशात भाजपचे सर्व नेते, निकम व जाधव कुटुंबीय, आई-वडील व भाऊ उद्योजक विशाल जाधव यांच्यासह कार्यकर्ते, मतदारांचे मोलाचे सहकार्य लाभले. राजर्षी शाहू महाराज, रणरागिणी ताराराणी यांचा वारसा लाभलेल्या कोल्हापूर संस्थानचा कारभार अत्यंत पारदर्शक व विकासाभिमुख करण्याचा मनोदय सौ. रूपाराणी निकम यांनी दै.‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news