धाराशिव : वाढत्या जिल्ह्यात हृदयविकाराच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक आरोग्य सुविधा अद्याप सुरू न झाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. स्थगितीच्या राजकारणामुळे अडकलेले कार्डियाक कॅथलॅब, एमआरआय मशीन आणि ५०० बेडच्या सिव्हिल हॉस्पिटलचे काम तातडीने पूर्ण करून सुरू करावे, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत केली.
सभागृहात आ. पाटील म्हणाले की, आज केवळ वयोवृद्धच नव्हे तर तरुणांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. धाराशिव जिल्ह्यात अनेक वर्षांपासून कार्डियाक कॅथलॅब उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना उपचारासाठी बाहेर जावे लागत आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये आरोग्य विभागाने सुमारे १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून एका वर्षात काम पूर्ण करण्याची मुदत दिली होती.
ऑक्टोबर २०२४ पर्यंत कॅथलॅब सुरू होणे अपेक्षित असताना अद्याप काम पूर्ण झालेले नाही. दहा वेडचे हॉस्पिटल आणि कार्डियाक कॅथलॅब मंजूर असूनही सुविधा सुरू न झाल्याने गंभीर रुग्णांना सोलापूर येथे हलवावे लागत आहे. 'गोल्डन अवर'मध्ये उपचार न मिळाल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू होत असल्याचेही त्यांनी सभागृहात नमूद केले.
कॅथलॅबसाठी आवश्यक ट्रान्सफॉर्मर आणि जनरेटरच्या निधीला स्थगिती मिळाल्याने काम अपूर्ण राहिल्याचे आ. पाटील यांनी स्पष्ट केले. २०२५-२६ मध्ये पुन्हा मंजुरी देण्यात आली असून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी संबंधित मंत्र्यांकडे केली.
धाराशिवसाठी मंजूर असलेली एमआरआय मशीन सरकार बदलल्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यात हलवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र स्थानिकांच्या आंदोलनानंतर मशीन जिल्ह्यातच ठेवण्यात आली. एमआरआयचे काम पूर्ण झाले असूनही केवळ कमिशनरच्या सहीअभावी मशीन सुरू झालेली नाही. परिणामी, रुग्णांना तपासणीसाठी बाहेर जावे लागत असून नागरिकांची हेळसांड होत असल्याकडे लक्ष वेधले.
नागरिकांना मिळेल दिलासा
धाराशिवमध्ये ५०० बेडचे सिव्हिल हॉस्पिटल मंजूर झाले असले तरी सुरुवातीला निधीची तरतूद नव्हती. वारंवार पाठपुराव्यानंतर एशियन डेव्हलपमेंट बँकेमार्फत निधी मंजूर झाला; मात्र प्रत्यक्ष काम अद्याप सुरू झालेले नाही. जिल्ह्यातील आरोग्य सुविधांसाठी हे रुग्णालय अत्यंत महत्त्वाचे असून काम तातडीने सुरू झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.