Dharashiv : शिरूर तालुक्यात हुंड्यासाठी विवाहितेचा बळी  File Photo
धाराशिव

Dharashiv : शिरूर तालुक्यात हुंड्यासाठी विवाहितेचा बळी

बावी येथील घटना; घर बांधण्यासाठी दहा लाखांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Married woman Ended his life for dowry in Shirur taluka

शिरूर, पुढारी वृत्तसेवा घर बांधण्यासाठी वडिलाकडून दहा लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत चौघांनी संगनमत करून नवविवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याने या छळाला कंटाळून नवविवाहितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शिरूर तालुक्यातील बावी या गावी गुरुवार दि. २८ ऑगस्टच्या पहाटे घडली आहे. याप्रकरणी मयत विवाहितेच्या फिर्यादीवरून पती, सासू, मामे सासरा, यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करिष्मा सचिन सांगळे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. शिरूर कासार तालुक्यातील राक्षसभुवन (तांबा) येथील शिवदत्त विठ्ठल पंडित यांची मुलगी करिष्मा हिचा साडेचार वर्षांपूर्वी सचिन नवनाथ सांगळे (रा. कुसळंब हल्ली मुक्काम बावी तालुका शिरूर) याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर पुढील तीन वर्ष यांचा संसारही सुखरूप होता. गेल्या वर्षभरापूर्वी हे दाम्पत्य सासू अरुणा सांगळे यांच्या शिरूर तालुक्यातील बावी या मामाच्या गावी शेतातील घरामध्ये राहत होते.

करिष्माने वडिलांकडून घर बांधण्यासाठी दहा लाख रुपये घेऊन यावेत अशी मागणी पती सचिन नवनाथ सांगळे, सासू अरुणा नवनाथ सांगळे, मामे सासरा भगवान रामभाऊ राऊत, मामे भाऊ तुकाराम भगवान राऊत यांच्याकडून गेल्या वर्षभरापासून केली जात होती. करिष्मा माहेराहून पैसे आणत नाही म्हणून या चौघांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला जात होता.

या छळाला कंटाळून करिष्मा सचिन सांगळे या विवाहितेने आपल्या अडीच वर्षाच्या चिमुकलीची परवा न करता बुधवार दि. २७ ऑगस्टच्या पहाटे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सदरील घटना घरच्या लोकांच्या लक्षात आल्यानंतर तिला रायमोह येथे उपचारासाठी हलवण्यात आले होते. रायमोह येथे उपचार न मिळाल्याने पुढील उपचारासाठी बीड कडे हलवण्यात आले मात्र उपचारादरम्यान करिष्मा सांगळे या विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि. २८ ऑगस्ट रोजी पहाटे घडली आहे.

मयत करिष्माचे वडिल शिवदत्त विठ्ठल पंडित यांच्या फिर्यादीवरून आरोपी पती सचिन नवनाथ सांगळे, सासू अरुणा नवनाथ सांगळे, मामे सासरा भगवान रामभाऊ राऊत मामेभाऊ तुकाराम भगवान यांच्याविरुद्ध हुंड्याच्या मागणीसाठी आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे. आरोपी सासू अरुणा सांगळे यांना पोलिसांनी अटक केली असून सचिन सांगळेसह भगवान राऊत, तुकाराम राऊत हे आरोपी अद्याप फरार आहेत या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करिष्माच्या माहेरच्या नातलगांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT