माळुंब्रा येथील प्रस्तावित हवाई धावपट्टीच्या जागेची पाहणी करताना भारतीय विमान प्राधिकरणाचे अधिकारी. pudhari photo
धाराशिव

Dharashiv airport project : माळुंब्रा येथील प्रस्तावित धावपट्टीची पाहणी

धाराशिव विमानतळावर वैमानिक प्रशिक्षण केंद्र

पुढारी वृत्तसेवा

धाराशिव : जिल्ह्याच्या कृषी, उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथे प्रस्तावित चार किलोमीटर लांबीच्या हवाई धावपट्टीच्या जागेची भारतीय विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी पाहणी केली. पाहणीनंतर पथकाने जागेबाबत सकारात्मकता दर्शविल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

माळुंब्रा येथील प्रस्तावित धावपट्टी राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वेमार्गालगत असल्याने दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. कृषी मालाची जलद वाहतूक, औद्योगिक गुंतवणूक आणि तुळजापूरसह परिसरातील पर्यटनविकासाला यामुळे चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

या ठिकाणी तारा प्रकल्पासह हवाई धावपट्टी उभारण्याचा प्रस्ताव असून, त्यासाठी मागील काही महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे. पाहणी पथकात भारतीय विमान प्राधिकरणाचे जनरल मॅनेजर रोशन कांबळे, अनुराग मिश्रा, संजय उके, सुशिल वर्मा, प्रदीप मौर्या, संतू दास व राजेश जीवन यांचा समावेश होता. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, पथकाने धाराशिव येथील हवाई धावपट्टीचीही पाहणी केली. या धावपट्टीची दुरुस्ती करण्यात आली असून येथे वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. तसेच मिलिटरी ड्रोनच्या चाचण्या, भविष्यात ड्रोन निर्मिती व संशोधन केंद्र विकसित करण्याचेही नियोजन आहे. माळुंब्रा धावपट्टी आणि धाराशिव विमानतळाच्या विकासामुळे कृषी, उद्योग, पर्यटन व ड्रोन तंत्रज्ञान क्षेत्राला नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT