वाशी : सर्वसामान्य नागरिकांच्या महसुली तक्रारी व प्रशासकीय प्रश्नांना थेट अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी मिळावी आणि त्यावर त्वरित निर्णय व्हावा, यासाठी शासनाने दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरावर ‘लोकशाही दिन’ आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत.
या लोकशाही दिनाचे पदसिद्ध अध्यक्ष तहसीलदार असतात. मात्र वाशी तहसील कार्यालयात शासनाच्या या आदेशाची पायमल्ली होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. डिसेंबर 2025 ते फेब्रुवारी 2026 या सलग तीन महिन्यांत वाशी तहसील कार्यालयात लोकशाही दिन पार पडलेलाच नसल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुक्यातील अनेक नागरिक जमिनीचे प्रश्न, रेशनसंबंधी अडचणी तसेच इतर प्रशासकीय तक्रारी घेऊन मोठ्या अपेक्षेने तहसील कार्यालयात येतात. मात्र आज तहसीलदार साहेब नाहीत, त्यामुळे लोकशाही दिन होणार नाही, असे सांगून त्यांना माघारी पाठवले जात असल्याची तक्रार आहे.
प्रशासकीय नियमांनुसार तहसीलदार काही कारणास्तव उपस्थित राहू शकत नसल्यास त्यांनी नायब तहसीलदार किंवा अन्य सक्षम अधिकाऱ्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवून लोकशाही दिन पार पाडणे आवश्यक असते. मात्र वाशी तहसील कार्यालयात अशी पर्यायी व्यवस्था केल्याचेही दिसून येत नाही. लोकशाही दिनामध्ये आलेल्या तक्रारी व त्यावरील कार्यवाहीचा सविस्तर संगणकीकृत अहवाल संबंधित तहसीलदारांनी त्याच आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणे बंधनकारक असते. मात्र प्रत्यक्षात लोकशाही दिनच होत नसल्यास हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे कसा पाठवला जातो, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या पार्श्वभूमीवर काही जागरूक नागरिकांनी माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत लोकशाही दिनाच्या अहवालांच्या प्रती मागविल्या आहेत. यामुळे प्रत्यक्षात लोकशाही दिन झाला की केवळ कागदोपत्री दाखवून शासन व जनतेची दिशाभूल केली जात आहे, हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या लेखी तक्रारींकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप होत असून, या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नागरिकांची गैरसोय
तहसील कार्यालयात लोकशाही दिनाच्या नावाखाली जनतेची फसवणूक होत आहे. मी सकाळी 10 वाजता तक्रार घेऊन तहसील कार्यालयात गेलो होतो. त्या वेळी कार्यालयात हालचाल रजिस्टरही ठेवलेले नव्हते. चौकशी केली असता ‘साहेब बाहेर गेले आहेत, आज लोकशाही दिन होणार नाही’ असे सांगून मला माघारी पाठवले. वरिष्ठांनी या प्रकरणाची चौकशी करून दप्तर दिरंगाईनुसार संबंधितांवर कारवाई करावी असे ऋषीकेश सुदाम मोहिते यांनी सांगितले.
माहिती घेतो : तहसीलदार
दरम्यान, या प्रकाराबाबत अधिक माहिती जाणून घेण्यसाठी तहसीलदार प्रकाश म्हेत्रे यांच्याशी संपर्क साधला असता ‘मी या विषयाची कार्यालयात माहिती घेऊन सांगता’, अशी प्रतिक्रिया दिली.