तुळजापूर : महाराष्ट्रातील बस स्थानकांचा विकास करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून गुजरात राज्याच्या धर्तीवर बस पोर्ट विकसित करू, अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी (दि.३०) तुळजापुरात केली.
तुळजापूर येथे ७ कोटी ९१ लाख खर्च करून उभारण्यात आलेल्या शहर बस स्थानकाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उद्घाटनानंतर बोलताना त्यांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नाने उभारलेल्या या बस स्थानकाच्या उभारणीचे कौतुक केले. याप्रसंगी आमदार राणा जगजितसिंह पाटील, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार, जि प मुख्य कार्यकारी अधिकारी मौनक घोष, शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश साळुंखे, सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
प्रारंभी आमदार राणा जगजीत सिंह पाटील म्हणाले, तुळजाभवानी देवीच्या भक्तांसाठी राज्य शासनाच्या वतीने ७ कोटी ९१ लाख रुपये खर्च करून हे बस स्थानक उभारण्यात आले आहे. आगामी काळामध्ये संपूर्ण धाराशिव जिल्हा विकसित करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहोत. तुळजापूर विधानसभा क्षेत्रामध्ये एमआयडीसी विकास. कृष्णा खोरे विकास महामंडळातून येणारे सात टीएमसी पाणी विकास, सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे विकास आणि तुळजाभवानी मंदिर विकास व तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास, अशा वेगवेगळ्या पातळीवर विकासासाठी काम सुरू आहे, असे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी सांगितले. तसेच संपूर्ण जिल्ह्याचा अमुलाग्र बदल करण्यासाठी पालकमंत्री सरनाईक यांनी विश्वास दिला आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी पालकमंत्री प्रताप सर नाईक यांनी बोलताना राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सेवेसाठी प्रयत्नशील असून गुजरात राज्यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी ज्या पद्धतीने बस पोर्ट विकसित केले आहेत. त्याचेच अनुकरण करून महाराष्ट्रामध्ये बस पोर्ट ही संकल्पना आपण राबवणार आहोत, असे सांगितले. तसेच तीर्थक्षेत्र तुळजापूर विकसित होण्यासाठी राज्य शासन मोठ्या प्रमाणावर प्रयत्नशील असून आगामी काळामध्ये तुळजापूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या एकत्रित विकास आराखड्यासाठी आमदार पाटील यांना आपण मंत्रिमंडळाच्या माध्यमातून पाठबळ देऊ, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने पालकमंत्री आणि आमदार यांचे स्वागत करण्यात आले.
तुळजापूर येथील हे बसस्थानक उभारण्यासाठी दीर्घकाळ लागला. परंतू, उद्घाटन करण्यासाठी धावपळ झाल्याचे दिसून आले. या ठिकाणी कार्यक्रमाला विद्युत पुरवठा देखील अन्य मार्गातून घ्यावा लागला. तसेच संरक्षक भिंत आणि इतर अपुरे कामे याकडे शहरवासीयांनी बोट ठेवले.