

मुंबई : महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी विनाअडथळा सुविधा पुरविली जात आहे. राज्यातील सर्वच भागात गुंतवणूक व्हावी, यासाठी इको-सिस्टीम तयार केली जात आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षांत राज्यातील सर्वच भागाचा संतुलित विकास झाल्याचे दिसेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ वर्ड सेंटर येथे मंगळवारी आयोजित ‘इंडिया ग्लोबल फोरम नेक्स्ट 25’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि एआयआधारित प्रकल्प आणले जात आहेत. त्यासाठी कुशल मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही का, या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी नवनवीन संधी निर्माण करत आहोत. जागतिक पुरवठा साखळीसाठीही सुविधा उपलब्ध करत आहोत. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातसुद्धा महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करत असून, त्यासाठी कौशल्य विद्यापीठ कार्यरत आहे. त्यामुळे राज्यात कुशल मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही.
महाराष्ट्राला तीन ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेशाचे मोठे योगदान असणार आहे. एकट्या एमएमआर क्षेत्रात 1.5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था उभारण्याची क्षमता आहे, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. मुंबई महानगर प्रदेशबरोबरच राज्यातील ग्रामीण भागासह तर भागाच्या विकासावरही लक्ष देण्यात येत आहे. पुण्यात ऑटोमोबाईल, छत्रपती संभाजीनगरमध्ये इलेक्ट्रिक वाहन उद्योग हब होत आहे. तसेच, गडचिरोली जिल्हा हा देशातील नवीन स्टील हब म्हणून उदयास येत आहे. विदर्भात सोलर उत्पादन क्षेत्र वाढत आहे. शिर्डी, पुणे, नागपूर येथे विमानतळाचे काम सुरू आहे. तर दुष्काळमुक्तीसाठी सुमारे तीन लाख कोटींचे चार नदीजोड प्रकल्प राबविण्यात येत असून, विदर्भात कॅनॉलने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच 2029 मध्ये पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला. त्यामुळे आता नरेंद्र मोदींच्या वारसदाराबाबत विचार करण्याची गरज नाही, तशी वेळच आली नसल्याचे फडणवीस यांनी याच कार्यक्रमात स्पष्ट केले.