License revoked, but adulterated fertilizer still sold; stock seized
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा वृत्तसेवा : परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेला असतानाही मिश्र खताचे भेसळयुक्त उत्पादन करून त्याची विक्री केल्याप्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अणदूर व नळदुर्ग येथील कृषी सेवा केंद्रांवर भेसळयुक्त खत विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. या खताची किंमत ३ लाख १ हजार २५० रुपये आहे.
याप्रकरणी कृषी अधिकारी दिनेश प्रल्हादराव बनसोडे यांनी ११ ऑगस्ट रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनिल धर्माप्पा नागराळ (रा. एमआयडीसी, नांदेड), सुचेता खंडेराव स्वामी व ओंकार खंडेराव स्वामी (दोघे रा. अणदूर, ता. तुळजापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जून रोजी अणदूर येथील ओंकार कृषी सेवा केंद्रात, तर १९ जून रोजी नळदुर्ग येथील ओंकार कृषी सेवा केंद्रात भेसळयुक्त खताचा साठा आढळून आला. १०.२०.२० या खताच्या १०० पोत्यांपैकी ८० पोती, २०.२०.०० या खताच्या १०० पोत्यांपैकी ९२ पोती आणि १८.१८.१० या खताच्या १०० पोत्यांपैकी ७१ पोती असा साठा विक्रीसाठी ठेवण्यात आला होता.
महाराष्ट्र फर्टिलायझर अँड केमिकल प्रा. लि. या खत उत्पादक कंपनीचा परवाना कायमस्वरूपी रद्द केलेला असतानाही भेसळयुक्त खताचे उत्पादन व विक्री करून आर्थिक फायदा मिळविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. उर्वरित खत विक्रीच्या उद्देशाने गोदामात ठेवण्यात आले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नळदुर्ग पोलिस करीत आहेत.