Jayakwadi : जायकवाडीच्या पाण्याने ऊसशेतीला नवसंजीवनी !

कॅनल गंगथडी भागात ऊस लागवडीला वेग येण्याची शक्यता
Jayakwadi
Jayakwadi : जायकवाडीच्या पाण्याने ऊसशेतीला नवसंजीवनी !file photo
Published on
Updated on

Jayakwadi water breathes new life into sugarcane farming!

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा घनसावंगी व अंबड तालुक्यात सुरुवातीपासूनच पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता. अल निनोच्या तीव्रतेने पाऊस कमी पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने खरीप हंगामाबरोबरच ऊस लागवडीचेही गणित बिघडण्याची शक्यता होती. अनेक शेतकऱ्यांनी पाण्याची सोय नसल्याने नवीन ऊस लागवड करायची की नाही, याबाबत हात आखडता घेतला होता. मात्र, आता जायकवाडी धरणातील पाणीसाठा वाढत असून गोदावरी नदीपात्रातही पाणी आल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा समाधान दिसू लागले असुन या भागात ऊस लागवडीला वेग येण्याची शक्यता आहे.

Jayakwadi
Jalna Crime News : कुख्यात 'इम्मू डॉन' अखेर गजाआड

जायकडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्याने गोदावरी नदीला चांगले पाणी आले आहे. नदीकाठच्या गावांसह कालवा परिसरातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आता ऊस लागवडीचे नियोजन करता येणार असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

यंदा पावसाच्या सुरुवातीच्या काळात अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची मोठी पंचाईत झाली होती. खरीप पिके कशी वाचवायची आणि पुढील ऊस लागवडीसाठी पाणी कुठून आणायचे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला होता. विहिरी, बोअर तसेच नदी-नाल्यांमध्ये पुरेसे पाणी नसल्याने अनेकांनी नवीन ऊस लागवडीचा विचार पुढे ढकलला होता.

Jayakwadi
Jalna News : २० ऑगस्टपर्यंत अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण करा

घनसावंगी तालुक्यातील अनेक गावांची शेती गोदावरी नदी तसेच कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहे. नदीपात्रात पाणी आल्याने या भागातील विहिरी, बोअर आणि इतर जलस्रोतांनाही फायदा होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे खरीप पिकांसोबतच पुढील रब्बी हंगाम आणि ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, पाण्याची उपलब्धता वाढल्याने अनेक शेतकरी शेताची मशागत, बेणे उपलब्ध करून घेणे, ठिबक सिंचनाची तयारी आणि ऊस लागवडीचे नियोजन करताना दिसत आहेत. त्यामुळे येत्या काळात गोदाकाठ आणि कालवा परिसरात ऊस लागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.

घनसावंगी तालुका हा ऊस उत्पादनासाठी महत्त्वाचा पट्टा मानला जातो. तालुक्यात तीन कारखाने असून परिसरातील अनेक साखर कारखानेही या भागातून ऊस गाळपासाठी नेतात. त्यामुळे ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले तर त्याचा थेट फायदा आगामी गळीत हंगामाला होणार आहे.

ऊस उपलब्ध झाला तर कारखान्यांना गाळपासाठी पुरेसा कच्चा माल मिळेल. त्याचबरोबर ऊसतोड कामगारांना काम, वाहतूकदारांना वाहतुकीचे काम आणि शेतकऱ्यांना उत्पन्नाचा आधार मिळणार आहे.

जायकवाडीतील वाढता पाणीसाठा आणि गोदावरी नदीपात्रातील पाण्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाने ओढ दिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊन पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे शेतकरी ऊस लागवडीबाबत संभ्रमात होते. आता पाण्याची उपलब्धता वाढल्याने ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. मात्र, भविष्यातील दुष्काळ टाळण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर आणि योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
- श्रीनिवास थेटे, शेतकरी दैठणा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news