अण्णाभाऊ साठे जयंती  Pudhari File Photo
धाराशिव

Annabhau Sathe memorial project : अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी जागा हस्तांतरित

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे आदेश : भव्य स्मारक उभारणीचा मार्ग मोकळा

पुढारी वृत्तसेवा

धाराशिव : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या भव्य स्मारकाची अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा आता संपली आहे. धाराशिव शहरातील शासकीय दूध शीतकरण केंद्राची एक एकर जागा या स्मारकासाठी विनामूल्य देण्याचा अधिकृत आदेश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांनी निर्गमित केला आहे.

विशेष म्हणजे, या जागेसाठी द्यावे लागणारे सुमारे 2 कोटी 8 लाख रुपयांचे मूल्य शासनाने माफ केल्याने नगरपरिषदेचीही आर्थिक बचत झाली आहे. त्यामुळे भव्य स्मारक उभारणीचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे.

आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली. धाराशिव शहरात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा आणि भव्य स्मारक उभारण्यात यावे अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्यानुसार या स्मारकाच्या उभारणीसाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून यापूर्वीच आपण 1.50 कोटी निधी मंजूरही करवून घेतला आहे.

पालिका निवडणुकीच्या अगोदर शहरात अण्णा भाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याचे अभिवचनही आपण वचननाम्याच्या माध्यमातून शहरवासीयांना दिले होते. तत्कालीन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ऑगस्ट महिन्यात जागा हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला होता मात्र त्यासाठी नगरपालिकेला शासनाकडे जागेच्या मोबदल्यात बाजारभावाप्रमाणे 2 कोटी 8 लाख भरणे आवश्यक होते.

पालिकेकडे निधी नसल्याने हा विषय प्रलंबित होता. पालिकेची आर्थिक स्थिती पाहता ही रक्कम माफ करण्याची विनंती आपण शासनाकडे केली होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर सकारात्मक निर्णय होऊन 9 जानेवारी 2026 रोजी महसूल व वन विभागाने या जागेला ‌‘भोगवटादार वर्ग-2‌’ अंतर्गत महसूलमुक्त आणि मूल्यरहित तत्त्वानुसार मंजुरी देत जागा विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला होता.

राज्य शासनाच्या निर्णयानुसार जिल्हाधिकारी यांनी धाराशिव शहरातील शीतकरण केंद्राच्या अखत्यारितील असलेली 1 एकर जागा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकासाठी नगरपरिषदेकडे हस्तांतरित केली आहे. सोमवारी तसा अधिकृत आदेश त्यांनी जारी केला आहे. त्याचबरोबर या जागेच्या चतुःसीमाही निश्चित करण्यात आल्या असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

या जागेवर भव्य स्मारक, आकर्षक उद्यान आणि सुसज्ज अशी अभ्यासिका उभारण्यात येणार आहे. स्मारकामध्ये केवळ अण्णा भाऊंचा पूर्णाकृती पुतळाच नसेल, तर त्यासोबतच सुसज्ज बाग बगीचा परिसराच्या सुशोभीकरणासाठी आकर्षक उद्यानही विकसित केले जाणार आहे. अण्णा भाऊंच्या साहित्यावर आधारित अभ्यास केंद्र हे या स्मारकाचे आणखी एक वैशिष्ट्‌‍य असणार आहे. लोकशाहीर अण्णाभाऊंच्या विचारांची आणि सामाजिक लढ्याची स्मृती जिवंत ठेवणारे हे जिल्ह्यातील पहिले आणि मोठे स्मारक ठरणार आहे.

व्यापक लोकसहभागाची कृती समिती : आ. पाटील

धाराशिव शहरात साकारण्यात येणाऱ्या साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊंच्या भव्य स्मारकासाठी व्यापक कृती समिती गठित करण्यात येणार आहे. त्याची नोंदणी करून बँकेत खाते उघडले जाईल. पारदर्शकता रहावी यासाठी केवळ धनादेशाद्वारे थेट बँक खात्यात लोकसहभाग स्वीकारण्यात येईल. समाजबांधवांसह विविध समाज घटकातील नागरिकांच्या सहभागाने जिल्ह्यातील एक भव्य आणि ऐतिहासिक स्मारक उभारण्याचा आपला प्रयत्न आहे. सर्वप्रथम आपण.स्वतः एक लाख रुपयांचा व्यक्तिगत सहभाग लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकासाठी देत असल्याचेही आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT