Dharashiv Agriculture News : खरीप पिके पावसाच्या प्रतीक्षेत; दुबार पेरणीचे संकट File Photo
धाराशिव

Dharashiv Agriculture News : खरीप पिके पावसाच्या प्रतीक्षेत; दुबार पेरणीचे संकट

धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे आणि आसपासच्या परिसरात खरीप हंगामातील कोवळी पिके सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Kharif crops await rains; Double sowing crisis

कसबे तडवळे, पुढारी वृत्तसेवा : धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे आणि आसपासच्या परिसरात खरीप हंगामातील कोवळी पिके सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या दहा दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने आणि जोरदार वारे व उष्ण हवामानामुळे जमिनीतील ओलावा कमी होत चालला आहे. यामुळे पेरणी झालेली कोवळी पिके पाण्याअभावी कोमेजून जात असून, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

यंदा भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मे महिन्यापासून पावसाला चांगली सुरुवात झाली होती. तसेच, मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाही चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. तडवळे आणि परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी १५ ते २५ जून दरम्यान पेरण्या पूर्ण केल्या होत्या.

यासाठी त्यांनी खते आणि बी-बियाणे खरेदी करून मोठी गुंतवणूक केली होती. सुरुवातीच्या पावसावर आधारित पेरण्या झाल्याने पिके उगवून आली होती आणि कोवळी रोपे डोलू लागली होती. मात्र, गेल्या सुमारे दहा दिवसांपासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली आहे.

याउलट, परिसरात जोरदार वारे वाहत आहेत आणि उनही चांगले पडत आहे. या दुहेरी आघातामुळे जमिनीतील ओलावा वेगाने कमी होत आहे, परिणामी कोवळी पिके पाण्याअभावी कोमेजून जात आहेत. अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. शेतकरी आता पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पाऊस लवकर पडेल की नाही, या काळजीने ते ग्रासले आहेत.

पंधरा दिवसांपूर्वी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता, परंतु त्यानंतर पाऊस उघडल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. सध्याची परिस्थिती पाहता, येत्या चार दिवसांत पाऊस न पडल्यास कसबे तडवळेसह परिसरातील खरीप पिके पूर्णपणे वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक अडचणींमध्ये आणखी भर पडणार आहे. आधीच बी-बियाणे आणि खतांसाठी खर्च झाल्यामुळे दुबार पेरणीचा आर्थिक भार पेलणे शेतकऱ्यांसाठी कठीण होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT