Dharashiv News : अंगणवाडीच्या पोषण आहारावर डल्ला मारण्याचा प्रकार उघडकीस file photo
धाराशिव

Dharashiv News : अंगणवाडीच्या पोषण आहारावर डल्ला मारण्याचा प्रकार उघडकीस

तालुक्यातील चिंचपूर (ढगे) येथे अंगणवाडीतील लाभार्थ्यांसाठी असलेला शासकीय पोषण आहार खासगी वाहनातून विक्रीसाठी नेला जात असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला.

पुढारी वृत्तसेवा

Incident of siphoning off Anganwadi nutritional food exposed

भूम, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील चिंचपूर (ढगे) येथे अंगणवाडीतील लाभार्थ्यांसाठी असलेला शासकीय पोषण आहार खासगी वाहनातून विक्रीसाठी नेला जात असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. सतर्क ग्रामस्थांनी खासगी वाहन अडवून हा प्रकार उघड केला. विशेष म्हणजे पंचायत समितीच्या सभापतींच्याच गावात ही घटना घडल्याने प्रशासनाच्या देखरेखीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अंगणवाडीतील पोषण आहाराची संशयास्पद वाहतूक सुरू असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मिळालेल्या माहितीनुसार, खासगी वाहन (एमएच-१४ एचजी-०२५२) अडवले. वाहनामध्ये अंगणवाडीतील पोषण आहार भरला जात असल्याचे निदर्शनास आले. याची माहिती मिळताच बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश तुकडे यांनी कर्मचारी इंगळे यांच्यासह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

प्राथमिक चौकशीत अंगणवाडी क्रमांक ५०७ मधील गर्भवती महिला, स्तनदा माता, किशोरी मुली आणि लहान बालकांसाठी असलेला शासकीय पोषण आहार अधिकृत वितरण न करता अनधिकृतपणे बाहेर काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले. काही पोषण आहार रस्त्यावर सांडलेल्या अवस्थेतही आढळून आल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.

या घटनेनंतर संबंधित अंगणवाडी सेविकेविरुद्ध कठोर प्रशासकीय कारवाईचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश तुकडे यांनी दिली. मात्र, केवळ विभागीय चौकशी न करता संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करून संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या घटनेमुळे भूम तालुक्यातील अंगणवाड्यांमधील पोषण आहार वितरण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, जिल्हास्तरावरून स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT