दसमेगाव (ता. वाशी) : गावच्या शिवारात कांद्याच्या पिकात केलेली अफुची लागवड पोलिसांनी उघडकीस आणली. pudhari photo
धाराशिव

Illegal opium cultivation : कांद्याच्या आडमध्ये अफूचा मळा फुलला

वाशीत 72 लाखांची 485 किलो झाडे जप्त; शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

धाराशिव :कांद्याच्या पिकात लपवून अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्या एका शेतकऱ्याचा वाशी पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. दसमेगाव (ता. वाशी) येथे टाकलेल्या या छाप्यात पोलिसांनी तब्बल 72 लाख 84 हजार रुपयांची अफूची झाडे आणि बोंडे जप्त केली आहेत. ग्रामीण भागात सर्रास सुरू असलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

वाशी तालुक्यातील दसमेगाव येथील गट क्रमांक 163 मध्ये बेकायदेशीर अफूची लागवड केल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वाशी पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेतमालक समाधान मनोहर उघडे यांच्या शेतावर छापा टाकला. यावेळी शेतात कांद्याचे पीक उभे होते. मात्र, या कांद्याच्या आड अफूची झाडे लावून ती लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

485 किलोचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी केलेल्या पाहणीत आणि मोजणीत शेतात मोठ्या प्रमाणात अफूची हिरवी बोंडे आणि झाडे आढळून आली. या कारवाईत पोलिसांनी 485.65 किलो वजनाची अफूची झाडे जप्त केली आहेत. बाजारभावानुसार या मुद्देमालाची किंमत तब्बल 72 लाख 84 हजार 750 रुपये इतकी आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला असून, वाशी पोलिस ठाण्यात संबंधित शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कांद्याच्या किंवा इतर पिकांच्या आड अफू किंवा गांजासारख्या अमली पदार्थांची लागवड करणे हा गंभीर गुन्हा आहे. ग्रामीण भागात अशा प्रकारे छुपी शेती करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आम्ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. कोणाच्याही शेतात असे प्रकार आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.
रितू खोखर, पोलिस अधीक्षक, धाराशिव.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT