Heavy rains in Kalamba taluka
कळंब, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात काल सायंकाळपासूनच पावसाने हजेरी लावली होती परंतु रात्री दहानंतर पावसाचा जोर वाढत गेला मध्यरात्री ढगफुटीसदृश पाऊस झाला असून त्याची सरासरी १६० मि.मी. पेक्षा जास्त आहे. त्यामुळे मांजरा, वाशीरा नदीला पूर आल्यामुळे शेतात असलेले शेतकरी अडकले असून अनेक ठिकाणी जनावरांचेही हाल झाले आहेत.
आढाळा गावातील काही जनावरे व शेळ्या दगावलयाची माहीती मिळत आहे. तर खोंदला येथील शेतकरी सुब्राव लांडगे हे शेतातून येत असताना पुलावरून पाय घसरल्याने मांजरा नदीपात्रात वाहून गेले आहेत. त्यांच्या शोधमोहीमेसाठी एन डी आर एफ चे पथक तैनात झाले असुन शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू आहे.
नदीचया पात्राच्या बाजूला असणार्या शेतातील सोयाबीनचे पिक उद्धस्त झाले आहे. त्याठिकाणी आमदार कैलास श्र पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील, शिवसे-नेचे नेते अजित पिंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे विठ्ठल माने ठाण मांडून असुन प्रशासनाला ते सचना देऊन उपाययोजना राबवत आहेत. त्याचबरोबर उपविभागीय अधिकारी संजय पाटील, तहसीलदार हेमंत ढोकले, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार, कळंब चे पोलीस निरीक्षक अजित चिंतले घटनास्थळी उपस्थित आहेत.
मांजरा साठ टक्क्यांवर
कळंब शहरासह, लातूर, अंबाजोगाई, धारूर, केज व ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणारे आणि तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना वरदान ठरणारे मांजरा धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊन तीस टक्क्यांवरून साठ टक्क्यांवर पोहोचले आहे. आणखी पाण्याची आवक सुरू असून या आवकेवर धरण सकाळपर्यंत सत्तर टक्के भरेल, असा अंदाज शाखाधिकारी अनुप गिरी यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले.