

Heavy rains wreak havoc in Bhum taluka
भूम, पुढारी वृत्तसेवा : शहर आणि तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार, धुवाधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. आज (१४ ऑगस्ट) सकाळपासून पावसाचा जोर अधिक वाढला असून, सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नदी-नाल्यांना महापूर आला आहे. परिणामी, अनेक गावांचा संपर्क तुटला असून रस्ते, शाळा, शेती व वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. भूम तालुक्यातील बहुतांश महसूल मंडळात ६५ मि.मी. पेक्षा जास्त पर्जन्यमानाची नोंद झाली असून, संपूर्ण क्षेत्रामध्ये अतिवृष्टीची स्थिती निर्माण झाली आहे.
१५ ऑगस्टच्या निमित्ताने शाळांमध्ये झेंडावंदनासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पाण्याच्या प्रवाहातून मार्ग काढावा लागला. संगमेश्वर प्रकल्प ईटपासून मांजरा नदीकाठच्या ईट पांढरेवाडी, डोकेवाडी, गिरवली, सोन्नेवाडी, जानकापूर, पारगाव, जेबा, लाखणगाव, फक्राबाद, डोंगरेवाडी व सेलू या गावांमधील शेतांतील सोयाबीनसह इतर सर्व पिके पाण्याखाली गेली आहेत. डुक्करवाडी येथील साठवण तलावाचा भराव दोन्ही बाजूंनी खचल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. वालवड, अंतरगाव, हाडोंग्री, कानडीसह अनेक गावांमध्ये शेती व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
कसबा येथील अंबाबाई मंदिराजवळील पुलावरून पाणी वाहत आहे, तर कनडी अंतरगाव पुलावरून जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. रामेश्वर गावाचा बाहेरील जगाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. पाटसांगवी संगम नदी रौद्ररूप धारण करून वाहत असून, पांगरी गावातील हातोला नदीच्या पुरामुळे शेतांमध्ये पाणी शिरून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
बेदरवाडी येथील दुधना नदीला आलेल्या पुरामुळे वाहतूक बंद झाली आहे. वांगी खुर्द-अंतरगावदरम्यानचा पूल पाण्याखाली गेला आहे, तर चिंचपूर ढगे येथील बाणगंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. सावरगाव-देवंग्रा पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे बार्शी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, नदी-नाल्यांच्या जवळ जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तालुक्यातील इतर अनेक भागांमध्येही जास्त पाऊस झाल्याने शेतीचे व पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्राप्त माहिती ही प्राथमिक स्वरूपाची असून, प्रत्यक्षात याहून अधिक नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.