Heavy rains; damage to Kharif crops, disruption to normal life
भूम, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात गुरुवारी (दि. १८) दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले असून, बांधबंधारे फुटल्यामुळे शेतीचेही नुकसान झाले आहे. यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. दुपारी २ ते ४ या वेळेत झालेल्या जोरदार पावसाने काढणीला आलेल्या उडीद, सोयाबीन यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अनेक शेतात पाणी साचल्याने उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. तसेच, अनेक ठिकाणी शेतांचे बांध फुटल्यामुळे माती वाहून गेल्याचे चित्र आहे. या पावसामुळे भूम परिसरातील बाणगंगा नदी, विश्वरूपा नदीसह सर्व ओढे आणि नाल्यांना पूर आला आहे. यामुळे अनेक गावांना जोडणारे रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक थांबली होती. भूम शहरातील रस्त्यांनाही ओढ्याचे स्वरूप आले होते, ज्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. शहरातील सखल भागातील काही घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
तालुक्यातील भूम, माणकेश्वर, ईट, पाथरुड, आंबी, वंजारवाडी, आरसोली, चिंचपूर ढगे आदी गावांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरूच आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
भूम येथे गुरुवारी आठवडे बाजार असल्याने अनेक शेतकरी आणि व्यापारी मोठ्या संख्येने आले होते. मात्र दुपारी अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे बाजारात मोठी तारांबळ उडाली. व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला माल आणि साहित्य भिजल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले.