भूम : तालुक्यात अनेक भागात वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावली. यात पिकांसह घरांचेही नुकसान झाले.  pudhari photo
धाराशिव

Bhoom Heavy Rain : भूम तालुक्यात पावसाचा कहर

पिके, घरे आणि जनावरांचे मोठे नुकसान; अंजनसोंडा येथे विजेचा प्रवाह सुरू राहिल्याने दोन म्हशी दगावल्या

पुढारी वृत्तसेवा

भूम : शहरासह संपूर्ण तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे शेतकरी व सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. याच पार्श्वभूमीवर ईटजवळील अंजनसोंडा येथे विद्युत प्रवाहाच्या धक्क्‌‍याने दोन म्हशी दगावल्याची धक्कादायक घटना घडली असून एका भूमिहीन शेतकऱ्याला सुमारे अडीच लाख रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे.

सायंकाळी आठ वाजल्यापासून सुरू झालेला पाऊस रात्रभर कोसळत राहिला. तालुक्यातील पाचही मंडळांमध्ये सरासरी 85.4 मिलिमीटर म्हणजेच 65 टक्के पावसाची नोंद झाली. यामध्ये माणकेश्वर मंडळात सर्वाधिक 100.4 मिमी, आंबी मंडळात 81 मि.मी., भूम मंडळात 82.8 मिमी, वालवड मंडळात 77.4 मिमी आणि ईट मंडळात 84.6 मिमी पावसाची नोंद झाली.अतिवृष्टीमुळे वारेवडगाव, भोगलगाव आणि कासारी परिसरातील केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत.

उभी पिके आडवी पडल्याने शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. अनेक घरांवरील पत्रे उडून गेली असून काही घरांची पडझड झाली आहे. तसेच अंगणवाडी, वाचनालय आणि इतर सार्वजनिक इमारतींचेही नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीज खांब कोसळून वीजपुरवठा खंडित झाला असून मोठमोठी झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतुकीलाही अडथळे निर्माण झाले आहेत.दरम्यान, ईट येथून जवळ असलेल्या अंजन सोंडा गावात महावितरणच्या कथित निष्काळजीपणामुळे दोन म्हशींचा मृत्यू झाला.

अशोक कुचेकर हे नेहमीप्रमाणे आपल्या म्हशी बांधावरून घेऊन जात असताना जमिनीवर पडलेल्या विद्युत तारेला म्हशींचा स्पर्श झाला. या तारांचे कनेक्शन एक वर्षापूर्वी गावकऱ्यांनी बंद केल्याचे सांगितले जात असले तरी अलीकडील पावसानंतर त्या तारांमध्ये पुन्हा विद्युत प्रवाह सुरू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

विद्युत धक्का बसल्याने दोन्ही म्हशी जागीच दगावल्या.नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे. तसेच अंजन सोंडा येथील घटनेची चौकशी करून संबंधित जबाबदार कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा आणि मृत म्हशींच्या मालकाला तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ व युवकांकडून करण्यात येत आहे.

महावितरणबद्दल नाराजी

या घटनेमुळे अशोक कुचेकर यांचे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. गावकऱ्यांनी महावितरणच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. महावितरणचे कर्मचारी दोन ते चार महिने गावात फिरकत नाहीत. किरकोळ कामे गावकरी स्वतःच करतात. अधिकाऱ्यांना फोन केल्यास प्रतिसाद मिळत नाही, असा आरोप स्थानिकांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT