Dharashiv Rain : धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत  File Photo
धाराशिव

Dharashiv Rain : धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

शहरातील अनेक रस्ते गेले पाण्याखाली

पुढारी वृत्तसेवा

Heavy rain disrupts normal life in Dharashiv district

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन दिवसांपासून धाराशिव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पावसाची संततधार सुरू असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील अनेक प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले असून, वाहतूक ठप्प झाली आहे. सततच्या पावसामुळे सूर्यदर्शन न झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. विशेषतः सोयाबीन पिके पिवळी पडून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने नुकसान अटळ मानले जात आहे. सलग दोन दिवसांच्या पावसामुळे शाळा-महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची उपस्थिती अत्यल्प राहिली आहे. सरकारी कार्यालयांमध्येही कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी असल्याने प्रशासकीय कामकाजावर परिणाम झाला आहे.

शहरातील बसस्थानक परिसर जलमय झाला आहे. शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक हा रस्ता नेहमीप्रमाणे पाण्याखाली गेला होता. यामुळे वाहनधारकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागले. अनेक वस्ती भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत.

लोहारा तालुक्याने सरासरी ओलांडली

जिल्ह्याची वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६०३.१ मिमी असून, आतापर्यंत ८१.६ टक्के पाऊस झाला आहे. लोहारा तालुक्याने १०० टक्के सरासरी पावसाचा टप्पा ओलांडला आहे. तर धाराशिव तालुक्यात केवळ ६६.७ टक्के पाऊस झाला असून, तो सर्वात कमी आहे. वाशी, भूम, कळंब, उमरगा आणि तुळजापूर हे तालुके ८० ते ९० टक्क्यांच्या दरम्यान आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT