Health Department ready for Ashadhi Wari
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी लाखो वारकरी पंढरपूरकडे पढरपूरकड प्रस्थान करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्हा आरोग्य विभागाने व्यापक आरोग्य नियोजन पूर्ण केले आहे. १२ जुलै २०२६ पासून जिल्ह्यातून विविध प्रमुख पालख्या मार्गक्रमण करणार असून, वारकऱ्यांना सुरक्षित व तत्पर आरोग्य सेवा देण्यासाठी उपचारात्मक तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
यंदाच्या वारीत श्री गजानन महाराज (शेगाव), श्री संत एकनाथ महाराज (पैठण), श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थान (कोंडण्यापूर, विदर्भ) तसेच श्री क्षेत्र मुक्ताईनगर या प्रमुख पालख्या जिल्ह्यातून जाणार आहेत. जिल्ह्यात एकूण १७पालखी मुक्कामस्थळे निश्चित करण्यात आली असून, प्रत्येक ठिकाणी आरोग्य सेवा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी स्थिर व फिरती पथके तैनात करण्यात आली आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि शासकीय संस्थांच्या माध्यमातून प्रथमोपचार सेवा, औषधसाठा आणि आरोग्यदूतांची व्यवस्था करण्यात आली आहे. जलजन्य व कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिण्याच्या पाण्याचे स्रोत, टँकर्स, हॉटेल, ढाबे यांची तपासणी तसेच पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मुक्कामस्थळी ताप सर्वेक्षण, संसर्गजन्य आजारांवरील नियंत्रण आणि विशेष प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात येणार आहे.
वयोवृद्ध वारकऱ्यांसाठी स्वतंत्र आरोग्य सुविधा, आयुष्मान भारत कार्ड नोंदणी तसेच योग प्रात्यक्षिकांचे आयोजनही केले जाणार आहे.
आरोग्य यंत्रणेचा २४ तास बंदोबस्त
पालखी मार्गावर तज्ज्ञ डॉक्टर व प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांची २४ तास पथके कार्यरत राहणार आहेत. प्रत्येक पथकासोबत रुग्णवाहिका उपलब्ध राहील. १०२ क्रमांकाच्या २० आणि १०८ क्रमांकाच्या ७ रुग्णवाहिका तसेच आरोग्यदूत सेवा सतत कार्यरत राहणार आहे. तसेच खासगी रुग्णालयांमध्ये १० टक्के खाटा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.
सामाजिक आरोग्य उपक्रमांवर भर
मुक्काम व विसाव्याच्या ठिकाणी 'हिरकणी कक्ष' स्थापन करण्यात येणार असून, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची माहिती वारकऱ्यांना दिली जाणार आहे. आयएमए आणि स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या सहकार्याने स्वयंस्फूर्ती वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.