crime news  file photo
धाराशिव

Dharashiv Crime : तुळजापुरात पुन्हा बंदुकीचा धाक; हॉटेलसमोर गोळीबार, शहरात खळबळ

दीड महिन्यात गोळीबाराची दुसरी घटना; दोन तरुणांना अटक

पुढारी वृत्तसेवा

Gun scare again in Tuljapur; firing outside a hotel causes panic in the city

तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा :

तुळजाभवानी मातेचे शक्तीपीठ असलेल्या तुळजापूर शहरात शांतता भंग करणारी घटना पुन्हा एकदा घडली आहे. अवघ्या दीड महिन्याच्या अंतराने शहरात दुसऱ्यांदा गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी (दि. ७) रात्री धाराशिव रोडवरील एका हॉटेलसमोर किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून हा गोळीबार झाला. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे.

विशेष म्हणजे, नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणूक निकालाच्या दिवशी दोन गटांत झालेल्या वादातून गोळीबार झाला होता. ती घटना ताजी असतानाच आता पुन्हा गोळीबार झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अवघ्या ४५ दिवसांत (दीड महिना) गोळीबाराची ही दुसरी घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून, पोलीस सखोल तपास करत आहेत.

किरकोळ वादातून ट्रिगर दाबला

उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्रीच्या सुमारास धाराशिव रोडवरील हॉटेल परिसरात दोन गटांमध्ये काही कारणावरून बाचाबाची झाली. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन रागाच्या भरात गोळीबार करण्यात आला. गोळीबाराचा आवाज ऐकू येताच परिसरात घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि संबंधित दोन तरुणांच्या मुसक्या आवळल्या.

धार्मिकनगरीला गुन्हेगारीचे ग्रहण ? : तुळजापुरात देशभरातून भाविक येत असतात. मात्र, अलीकडे शहरात गन कल्चर वाढताना दिसत आहे. तलवारी आणि गावठी कट्टे सर्रास वापरले जात असल्याचे चित्र आहे. दीड महिन्यात दोनवेळा भरवस्तीत गोळीबार झाल्याने, पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक उरला नाही का? असा संतप्त सवाल तुळजापूरकर विचारत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT